हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांची गंभीर दखल घेत हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावांच्या मुख्य चौकात, बसथांब्यांजवळ आणि फाट्यांवर स्पीड ब्रेकर, बॅरिकेट व आवश्यक सूचना फलक उभारण्याची मागणी त्यांनी केली.


हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन काही वर्षेच झाली असताना रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच अनेक गावांच्या मुख्य चौकात व वर्दळीच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


मागील काही दिवसांत टाकराळा बु. फाटा आणि सोनारी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातांत अनेक युवकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनारी फाटा येथील नागरिकांनी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची भेट घेऊन महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी जवळगावकर यांनी नागरिकांच्या मागणीची गंभीर दखल घेत तत्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता श्री. देशपांडे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.



“हिमायतनगर–भोकर महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. मागील काही दिवसांत झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गावांच्या मुख्य चौकात व बसथांब्यांजवळ वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर, बॅरिकेट तसेच आवश्यक सूचना फलक नसल्याने अपघाताचा धोका वाढत आहे,” असे माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले.
“नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दिरंगाई न करता सोनारी फाटा, टाकराळा फाटा तसेच इतर अपघातप्रवण ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत. आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट उभारून वाहनचालकांना सावधानतेच्या सूचना देणारे फलक लावावेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, सोनारी येथील नागरिकांनीही या मागणीचे स्वागत केले आहे. “काही दिवसांपूर्वी टाकराळा बु. फाट्यावर दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी निर्मल येथून सोनारी येथे आलेल्या युवकांपैकी एकाचा सोनारी फाट्यावरील अपघातात मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांत एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी माजी आमदार जवळगावकर यांनी गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या मार्गावरील हिमायतनगर शहरातील मुख्य चौक, सरसम, इंदिरानगर, टेंभी फाटा, करंजी, सोनारी फाटा, पारवा, मोरगाव फाटा, टाकराळा फाटा, राजवाडी फाटा, वायवाडी, वडगाव आदी ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, बॅरिकेट व अपघात प्रतिबंधक सूचना फलक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी स्वीय सहाय्यक अजय सूर्यवंशी, नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी जी. प. सदस्य सुभाष दादा राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, संजय माने, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, समद भाई, श्रीदत्त पाटील सोनारीकर, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपातवाड, अनिल मादसवार, सोपान बोंपीलवार, अशोक अनगुलवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सोनारी येथील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आता तरी महामार्ग विभाग जागा होणार का?
माजी आमदारांच्या मागणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आता अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना केल्या जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ‘आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

