
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मुन्नाभाऊ उर्फ माधव शिंदे यांच्यावतीने देण्यात आला आहे.


यासंदर्भात युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे (स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड) यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली की, यापूर्वी दोन वेळा हिमायतनगर नगरपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व फसवणूक झाल्याचा आरोप करत, माधव शिंदे यांनी येत्या दिनांक ३१ मार्च २०२६ पासून हिमायतनगर नगरपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.



“जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता निर्माण झाली असून, नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.




