Wednesday, May 13

उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

नवीन नांदेड l ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गंभीर गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. हा गौरव सोहळा दि. ३१ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पार पडला.

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांनी विविध गंभीर गुन्ह्यांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ग्रामीण गु.र.नं. ११९०/२०२५, कलम ३/२५, ७/२५ भा.ह.का. अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.

याचबरोबर पुणे शहरात खून करून फरार झालेले आणि नांदेड ग्रामीण हद्दीत दबा धरून बसलेले दोन पाहिजे आरोपी उपनिरीक्षक मठवाड यांनी शिताफीने ताब्यात घेऊन पुणे पोलीसांच्या स्वाधीन केले. तसेच ग्रामीण गु.र.नं. ११६२/२०२५, कलम ३०३ (२) बीएनएस अन्वये वाळू चोरी करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत सुमारे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली.

या सर्व धाडसी व उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रशस्तीपत्र देत म्हटले की, “आपण केलेल्या अविश्रांत परिश्रमाबद्दल मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. भविष्यातही आपण अशीच उत्कृष्ट व प्रेरणादायी कामगिरी बजावाल, ही अपेक्षा आहे.” या गौरवामुळे नांदेड ग्रामीण पोलीस दलात समाधानाचे वातावरण असून, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांच्या कार्यकुशलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!