धार्मिकनांदेड

Mahadev Lingam : बारूळ येथे श्री महादेव लिंग पुनर्रप्राणप्रतिष्ठा व भव्य-दिव्य नंदी लोकार्पण सोहळा

कंधार (प्रतिनिधी) शतकानुशतके ग्रामदैवत म्हणून पूजिले जाणारे आणि भाविकांच्या अढळ श्रद्धेचे केंद्र असलेल्या बारूळ येथील जागृत देवस्थान श्री महादेव मंदिरात सिंहासनावरील श्री महादेव लिंगाची पुनर्रप्राणप्रतिष्ठा तसेच भव्य-दिव्य नंदीच्या लोकार्पणाचा पावन सोहळा अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण बारूळ गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, गावाच्या कानाकोपऱ्यात “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे.

बारूळ येथील श्री महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ग्रामस्थांच्या श्रद्धा, संस्कार, परंपरा आणि सामाजिक एकजुटीचे प्रतीक मानले जाते. पिढ्यान्‌पिढ्या भाविकांचे या देवस्थानाशी घट्ट नाते जुळलेले असून, होणारा पुनर्रप्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण गावासाठी ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण ठरणार आहे.

या दिव्य सोहळ्यास गुरुवर्य श्री ष.ब्र.प्र. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, गणाचार्य मठ संस्थान, मुखेड; श्री १०८ प.पु. महंत यदुबन महाराज कोलंबीकर, दत्त मठ संस्थान, कोलंबी (नायगाव) तसेच प.पु. संत श्री नामदेव महाराज बारूळकर, मठ संस्थान, बारूळ यांची पावन उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या सान्निध्यात वैदिक विद्वानांच्या मंत्रोच्चारात आणि पारंपरिक धार्मिक विधींनी हा सोहळा पार पडणार आहे.

या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दि. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत शिवभक्तांसाठी भव्य शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. ही कथा शिवपुराणचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांच्या अमृतमय वाणीने सादर होणार असून, त्यांच्या प्रभावी प्रवचनातून शिवतत्त्व, भक्ती, वैराग्य आणि जीवनमूल्यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. ही कथा भाविकांसाठी आत्मिक समाधान व अध्यात्मिक उन्नती साधणारी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी होम-हवन, धार्मिक विधी, श्री महादेव लिंगाची विधीवत पुनर्रप्राणप्रतिष्ठा तसेच भव्य-दिव्य नंदीच्या लोकार्पणाचा मुख्य सोहळा गुरुवर्यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या पावन सोहळ्यानंतर समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांसाठी सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, तो बारूळ गावाच्या सांस्कृतिक परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा एक भव्य उत्सव आहे. या ऐतिहासिक व भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री महादेव मंदिर संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळ, बारूळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button