‘Garbage basket’ : आमदार कोहळीकरांच्या पत्राला हदगाव आगारप्रमुखांची ‘कचऱ्याची टोपली’

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे आणखी एक गंभीर उदाहरण समोर आले असून, हदगाव आगारप्रमुख यांनी हादगावचे स्थानिक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अधिकृत पत्रालाच ‘केराची टोपली’ दाखवल्याचा आरोप होत आहे. हिमायतनगर ते उमरखेड (पळसपूर–डोल्हारी–ढाणकी मार्गे) बंद असलेली बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदारांनी करून तब्बल तीन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.


ही बससेवा पूर्वी नियमित सुरू होती. मात्र, काही कारणास्तव ती बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी विभाग नियंत्रक यांच्याकडे तसेच हदगाव आगाराकडे लेखी पत्र देऊन सदर बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

हिमायतनगर–उमरखेड ही बससेवा उमरखेड, ढाणकी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हिमायतनगर रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी हा मार्ग सोयीचा असून, पळसपूर, डोल्हारी, सिरपली, गांजेगाव व ढाणकी येथील नागरिकांना शिक्षण, आरोग्य व व्यावसायिक कामांसाठी ही बससेवा जीवनवाहिनी ठरते.


मिळालेल्या माहितीनुसार, आमदार कोहळीकर यांनी आगारप्रमुख धर्माधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच दूरध्वनीवरूनही संपर्क साधला होता. मात्र, रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी न करताच “रस्ता खराब आहे” असे कारण पुढे करत बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात आली असलायचा आरोप या भागातील नागरीकातून केला जात आहे.

विशेष म्हणजे, दि. १ डिसेंबर २०२५ पासून उमरखेड आगाराने उमरखेड–ढाणकी–गांजेगाव–हिमायतनगर या मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत, तरीसुद्धा हदगाव आगाराकडून पळसपूर–डोल्हारी–सिरपली मार्गावरील फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या भागात मानव विकास योजनेअंतर्गत फेऱ्या दाखविल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी एकही स्वतंत्र प्रवासी फेरी उपलब्ध नाही.
परिणामी विद्यार्थी व प्रवाशांना अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, जीविताला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री विद्यार्थ्यांना गैरसोय झाल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देतात, तर दुसरीकडे हदगाव आगार व्यवस्थापक राजकीय भाषेत बोलत लोकप्रतिनिधींच्याच सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असतानाही बससेवा सुरू न केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींच्या आदेशांना जाणीवपूर्वक बगल देत असल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.



