उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील अंगणवाडी सेविका वनमाला उर्फ संध्या समृत कांबळे (वय 38) यांनी सासरच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी शंकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी वनमाला उर्फ संध्या हिचे लग्न पिंपळदरी (ता. लोहा) येथील समृत सखाराम कांबळे यांच्याशी सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुले असून वनमाला पिंपळदरी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. पती समृत कांबळे यांच्याकडून मोटारसायकल घेणे व घर बांधकामासाठी पैशांची मागणी करून तिला सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या त्रासाबाबत नातेवाईक व गावकऱ्यांना कळवूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने मुलीचा संसार वाचावा म्हणून फिर्यादीने यापूर्वी दोन लाख रुपये दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काही काळ परिस्थिती सुरळीत राहिल्यानंतर पुन्हा घर बांधकामासाठी तीन लाख रुपये आणण्याची मागणी करत पती, जाऊ, पुतण्या व ननंदांकडून संगनमताने मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचे वनमालाने वडिलांना सांगितले होते.


दरम्यान, 13 डिसेंबर रोजी दुपारी पिंपळदरी येथून फोनद्वारे वनमाला हिने गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने कापसी येथील शासकीय दवाखान्यात धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी मयताचे वडील शंकर पवार यांच्या फिर्यादीवरून पती समृत सखाराम कांबळे, जाऊ रमाबाई अमृत कांबळे, पुतण्या सिद्धार्थ अमृत कांबळे तसेच ननंद चित्राबाई नामदेव गायकवाड व ज्योतीबाई किशन शिरडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर पुढील तपास करीत आहेत.

