कंधार (सचिन मोरे) पती अंकुश पि. शिवाजी नाईकवाडे वय २८ वर्षे (राहणार पानभोसी ता. कंधार) व पत्नी ऋतुजा भ्र. अंकुश नाईकवाडे वय २३ वर्षे (राहणार पानभोसी ता.कंधार) हा.मु. (महागाव ता. पूर्णा जि.परभणी) यांचे तू- तू मै- मै अशा शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे पेव न्यायालयापर्यंत गेले. अशा शुल्लक कारणावरून दुभंगलेला संसार जुळविण्याचे काम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.पाटील आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.के. गुज्जर यांनी मध्यस्थी करून जुळविल्यामुळे या दोन्हीही न्यायदेवतांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


हरी नारायण लेंडाळे (रा.महागाव ता.पूर्णा जि.परभणी) यांची मुलगी ऋतुजा हिचे लग्न गत ४ वर्षांपूर्वी शिवाजी नाईकवाडे (रा. पानभोसी ता.कंधार) यांचा मुलगा अंकुश नाईकवाडे यांच्याशी रीतीरिवाजा प्रमाणे विवाह झाला होता. दोघांचा संसार हा आनंदाने सुरू होता. यात त्यांना दीड वर्षाचे गोंडस बाळही जन्मास आले आहे. परंतु गत दोन वर्षांमध्ये तू तू मी मी अश्या शुल्लक कारणावरून या दोघात खटके उडत गेले आणि दोघांचा संसार दुभंगला.

दोघांनीही कंधार न्यायालयात एकमेकाविरुद्ध तक्रार देऊन विभक्त राहण्याचे ठरविले. परंतु जन्मास आलेले दीड वर्षाचे गोंडस बाळ आणि या दोघांचेही वयाचा विचार करून दि. १३ डिसेंबर २०२५ या दिवशी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक आदालत मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.पाटील आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.के. गुज्जर यांनी मध्यस्थी करून दोघांनाही समज दिली. आणि एकमेकास पती-पत्नी म्हणून पूर्वीसारखेच राहण्यासाठी मन परिवर्तन केले. या दोघाही पती-पत्नी यांनी न्यायाधीश महोदयांचा आदर करून पती-पत्नी म्हणून एकत्र राहण्याचे मान्य केले.


दिनांक १३ डिसेंबर २०२५ या राष्ट्रीय लोक आदालत मध्ये दोन्ही न्यायाधीश महोदयांचे आभार मानून दोघा पती-पत्नींनी एकमेकास पुष्पहार घालून व तुळसी झाडाचे रोपटे देऊन एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ऋतुजा हिला पती अंकुश याने आपल्या पानभोसी येथील घरी घेऊन गेले. याप्रसंगी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.यू.जी. लुंगारे, ॲड.रूपकुमार कांबळे, ॲड.दिलीप कुरुडे, विमा सल्लागार ॲड. गणपत गवाले, ॲड.दिगंबर गायकवाड, ॲड.के.एस.बेग, ॲड.बी.एम.निलावाड, ॲड.बाबू पाटील,ॲड.महेश कारामुंगे, ॲड.एस.एल.लुंगारे यांच्यासह अनेक विधिज्ञ उपस्थित होते.


