हिमायतनगर,अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी दि.१८ रोजी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणा व भोंगळ कारभाराचा निषेध केला. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली मात्र जोपर्यंत किमान दोन शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही. असा पवित्र पालकांनी घेऊन शिक्षक देता येत नसतील तर आमच्या पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत द्या अशी कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान कुलूप लावून सहा दिवस लोटले परंतु शिक्षक देण्यास शिक्षणविभागाची अनास्था दिसून येत असल्याबाबत पालकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हिमायतनगर तालुका शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, त्यामुळे बहुतांश पालक वर्गांचा कल खाजगी शिक्षणाकडे वळत आहे. मात्र ग्रामीण भागात हि सुविधा नसल्याने बहुतांश पालक शासकीय शाळेत मुलं भरती करून शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी धडपडत आहेत. एकीकडे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घरोघरी फिरत असताना हिमायतनगर तालुक्यात मात्र उलट घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यात शिक्षणाच्या रिक्त जगन्माऊली प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. याचाच प्रत्यय हिमायतनगर तालुक्यातील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर दिसून आला असून, नवीन शैक्षणिक सत्राची शाळा सुरू झाली असताना येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी असूनही शिक्षक नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याला कारणही तसेच आहे शाळेच्या पहिल्या दिवशी आलेला शिक्षक पुन्हा आला नसल्याने कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला सहा दिवसापासून कुलुप आहे.
या ठिकाणी इयत्ता पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या शाळेत एकुण विद्यार्थी संख्या 80 असून, त्यामध्ये वाढ होण्यांची शक्यता आहे. पुर्वी शाळेवर जे शिक्षक होते त्यांच्या बदल्या झाल्याचे पालकांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी येथील शाळेवर किमान तीन शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी एक शिक्षक हजर होवुन शाळा बघुन निघुन गेला. त्यानंतर शाळा उघडलेली नाही त्यामुळे दिनांक 18 जून रोजी शालेय व्यवस्थापन समिती व गावांतील पालकांनी शाळेवर उपस्थित झाले. परंतु 11.30 एकही शिक्षक आला नसल्याने संतप्त झालेल्या सर्व शिक्षण प्रेमी पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून सहा दिवस लोटले मात्र अजूनही शिक्षण विभागाला शाळा सुरु करण्यात यश आले नाही. गटशिक्षण विभागाचे गट समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील यांनी भेट देऊन एक शिक्षक देतो आणि आठ दिवसांनी एका देऊ असे सांगितले. मात्र पालकांना शिक्षण विभागावर भरोसा नसल्याने त्यांनी तीन शिक्षकाची मागणी मान्य होईपर्यंत कुलूप काढणार नाही. विद्यार्थी संख्या बघुन शिक्षकांची त्वरीत नेमणुक करुन शाळा पुर्ववृत्त सुरु करा. शिक्षक देता येत नसतील तर आमच्या पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत द्या ही मागणी लावून धरली आहे.
तालुक्यातील 15 शाळांना शिक्षकच नाही ; शिक्षकांच्या 150 जागा रिक्त
हिमायतनगर तालूक्यात जि.प. च्या 110 शाळा असून, 150 शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत. तालुक्यात 15 शाळेला शिक्षकच नाहीत. तालुक्यातील 61 शाळा चौथी पर्यतच्या शाळेत नव्याने पाचवा वर्ग सुरु केला आणि सातवी पर्यतच्या 13 शाळेत आठवा वर्ग सुरु केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शिवाचार्य यांनी दिली. जि.प.च्या शिक्षण विभागाने पाचवी व सातवीला वर्ग वाढ ग्रामिण मुलांना गावात शिक्षणाची सुविधा द्यायची. दुसर्या बाजूनी 150 रिक्त जागा भरावयाच्या नाहीत. त्यामुळे ग्रामिण भागातील गरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान करण्याचे ठरविले आहे का..? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.
रिक्त जागांसाठी मुख्याधिकारी मिनल करनवाल यांना भेटणार – आ. माधवराव पाटील जवळगावकर
हिमायतनगर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यावरून जि.प. च्या मुख्याधिकारी मिनल करनवाल यांना भेटून रिक्त जागा भरण्याविषयी आग्रह धरणार आहे. तसेच गेल्या सहा दिवसापासून कोठा तांडा येथील शाळेला कुलूप लावलेले आहे. त्यामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. तेथे शिक्षक देऊन त्वरित शाळा चालू करा अश्या सूचना दि.२३ ओजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना पत्रकारासमक्ष दूरधवनीवरून दिल्या. यावेळी श्रीमती बिरगे उद्या सोमवारी कोठा तांडा शाळेतील शिक्षकांची समस्या सोडवून शाळा पूर्ववत चालू करू असे आश्वासन दिले. यामुळे आता हिमायतनगर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा देखील भरल्या जातील अशी अपेक्षा पालकांना आहे.