नांदेड| भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने मुख्यमंत्री सहायता निधीला नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वनिधीतून ३२ लाख ३२ हजार रुपयांचा निधी प्रदान केला आहे. कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.


याविषयी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यभरातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी आपल्या गाळपाच्या प्रमाणात स्वनिधीतून निधी देण्याबाबत राज्य सरकारने सूचित केले आहे. त्यानुसार भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटच्या वतीने एकूण ३२.३२ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव-येळेगाव स्थित युनिट क्र. १ च्या वतीने २१.०७ लाख तर हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा स्थित युनिट क्र. २ च्या वतीने ११.२५ लाख रुपयांचा समावेश आहे.


शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यभरातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडून निधी उभा करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना व सामाजिक उपक्रमांना मदत करण्यासाठी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतल्याचेही कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांनी सांगितले.




