नांदेड/पुणे| ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या तालुका व जिल्हा समन्वयकांचे मागील आठ महिन्यांपासून मानधन थकले असून त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. तर, अजूनही नियुक्ती न मिळालेल्या समन्वयकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या दुहेरी संकटामुळे संतप्त झालेल्या समन्वयकांनी ३ नोव्हेंबरपासून पुणे येथील राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


गेल्या १४ वर्षांपासून ग्रामविकास विभागाच्या ‘संग्राम’ व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्गत हे समन्वयक पंचायत समिती स्तरावर उत्तम व्यवस्थापन व तांत्रिक काम सांभाळत आहेत. मात्र, जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात नियुक्ती न मिळूनही त्यांनी विना पगारी काम केले. नंतर मार्च २०२५ मध्ये काहींना नियुक्ती दिली गेली, तर काही तालुक्यांतील समन्वयक अजूनही नियुक्तीविना आहेत.


नियुक्ती मिळालेल्या समन्वयकांना मात्र आजपर्यंत एकही रुपया मानधन दिले गेलेले नाही. संबंधित रक्कम राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यालय, पुणे येथे जमा असून ती ठरावीक व्यवस्थापन कंपनीला दिली न गेल्याने पगार अडकले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी ‘आपले सरकार सेवा केंद्र तज्ञ संघटने’ने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान प्रकल्प संचालकांना निवेदन देऊन काही प्रमुख मागण्या केल्या आहेत :


मार्च २०२५ पासून थकित मानधन तात्काळ द्यावे. पंचायत समिती स्तरावरील काम इतर ऑपरेटरकडे न देता समन्वयकांकडूनच करवावे. नियुक्ती व अधिकार शासनाकडे ठेवावेत व वय ५८ वर्षांपर्यंत नोकरी कायम ठेवावी. ‘समान काम समान वेतन’ तत्त्वानुसार पगारासह इतर शासकीय सुविधा द्याव्यात. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, वरील मागण्या मान्य न झाल्यास ३ नोव्हेंबरपासून पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.



