देगलूर| शहापूर येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची दहा एकरांवरची कापणी अज्ञात व्यक्तींनी जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित शेतकरी उपासमारीच्या संकटात सापडले आहेत.


शेतकरी शकुंतलाबाई बेनाळे, यलपा दुर्गा गाडगे, गंगुबाई यलपा गाडगे यांनी सततच्या पावसामुळे शेतात जाण्यासाठीचा रस्ता चिखलमय झाल्याने सोयाबीनची मळणी यंत्र शेतात नेता आली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी कापणी करून खळे तयार करण्याआधीच सोयाबीन शेतात खुपा लावून ठेवले होते.



मात्र, अकरा तारखेच्या पहाटे पाच वाजता शेजारच्या शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून आग लागल्याची माहिती दिल्यानंतर संबंधित शेतकरी घटनास्थळी पोहचले तेव्हा सर्व सोयाबीन जळून खाक झाले होते. धुराचे लोट निघत होते आणि शेती उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य पाहून शेतकऱ्यांचा हाभरडा फूटला. आधीच दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करत असताना या आगीतून शेतकरी आणखी बेभरवशाच्या स्थितीत आले आहेत.


शेतकऱ्यांची मागणी: शासनाने तात्काळ पंचनामा करून सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. घटनेमुळे शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अज्ञातांनी लावलेल्या या आगीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही नागरिक करत आहेत.



