हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील रहिवासी आणि साप्ताहिक नवपर्व चे मुख्य संपादक कानबा पोपलवार यांनी एलएल.बी. परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी परमेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.


सत्कार समारंभात मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर सेट श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, तसेच सदस्य विलास वानखेडे उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी “अन्यायग्रस्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीच्या माध्यमातून समाजसेवा करावी” अशी अपेक्षा व्यक्त केली.


पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे कानबा पोपलवार हे आता वकील म्हणून न्यायासाठी काम करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


या प्रसंगी पत्रकार नागोराव शिंदे, अनिल भोरे, पंडित ढोणे, साप्ताहिक उद्याचा सूर्योदय चे संपादक पांडुरंग गाडगे, टेंभी येथील उपसरपंच आनंद मूतणेपाड, अर्शद खान पठाण यांच्यासह परमेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अन्यायग्रस्त सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार,” अशी ग्वाही यावेळी नूतन ऍडव्होकेट कानबा पोपलवार यांनी दिली.


