किनवट/श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांच्या काठावरील शेती पाण्याखाली जाऊन पिके खरडून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफीसह प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत दिवाळीपूर्वी वितरित करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे किनवट माहूर तालुक्या च्या वतीने येथे दि 8 रोजी तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते व नांदेड-हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख एडवोकेट यश खराटे. किनवट माहूर विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल. तालुकाप्रमुख मारुती दिवशे पाटील, माहूर तालुका तालुकाप्रमुख जितू चोले. शहरप्रमुख प्रशांत कोरडे यांच्यासह किशोर बोलेनवार, नामदेव कातले, बालाजी वाघमारे, अक्षय वाघ, प्रमोद जाधव, शिवम देवकते आदींसह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात यावे, तसेच पीक कर्ज माफ करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे किनवट तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजीसह शेतकऱ्यांच्या व्यथा तीव्रतेने मांडण्यात आल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन करत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.,



