नांदेड| मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेच्या वतीने सहस्त्रकुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या सहस्त्र काव्यधारा या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी संवेदनशील कवी तथा पूर्व शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य देविदास फुलारी , संजीव कुलकर्णी , मसाप नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार यांच्या मार्गदर्शनात ही निवड करण्यात आली आहे.


येत्या ऑक्टोबर महिन्यात मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने सहस्त्रकुंड येथील पैनगंगेच्या सहस्त्र धारांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक आणि मनमोहक धबधब्याच्या निसर्गरम्य ठिकाणी हे कवी संमेलन पार पडणार आहे . निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करण्यात आलेले हे यावर्षीचे पहिले वहिले कवी संमेलन असणार आहे.


कवी संमेलनाचे उद्घाटन हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार अनिल मादसवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. महेश मोरे , उपाध्यक्ष दिगंबर कदम, उपाध्यक्ष श्रीनिवास मस्के , सहकार्यवाह राम तरटे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


या कवी संमेलनात नांदेड जिल्ह्यातील विविध भागातील कवी सहभागी होणार आहेत अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान व्यंकटेश चौधरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि साहित्यिकांकडून अभिनंदन होत आहे.



