नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत नांदेड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरील समस्यांबाबत विस्तृत चर्चा केली.


या महामार्गाशी निगडित अनेक अडचणींच्या अनुषंगाने खा. अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर गडकरींनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन अडचणी समजून घेण्याचे व उपाययोजना प्रस्तावित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खा. अशोकराव चव्हाण यांनी आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते.


या चर्चेत बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे व धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे यांनी लातूर फाटा ते दूध डेअरी चौक या २ किलोमीटर अंतरापर्यंतच्या उड्डाण पुलामुळे नागरिकांचे रस्ता ओलांडण्याचे मार्ग बंद झाल्याचे नमूद केले. उड्डाणपुलाखाली ५ ठिकाणी अंडरपास व स्पीडब्रेकर बांधण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली. धनेगावातील पावसाच्या पाण्याचा व सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाहानुसार निचरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचीही आवश्यकता त्यांनी विषद केली.


राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ मुळे पिंपळगाव महादेवपासून नांदेड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अनेक गावातील वाहनचालकांना रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जाण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. महामार्गावरील वेगवान व व्यस्त वाहतुकीमुळे रस्ता ओलांडणाऱ्या अनेक वाहनांचा अपघात होऊन हा परिसर ‘ब्लॅकस्पॉट’ बनला आहे. त्यामुळे या महामार्गावर आवश्कतेप्रमाणे रस्ता ओलांडण्यासाठी अंडरपाससारखे सुरक्षित पर्याय व सर्व्हिस रोड उभारण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली.

परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता या महामार्गावरील अडचणींबाबत तोडगा काढण्याची सूचना खा. अशोकराव चव्हाण यांनी याप्रसंगी मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार आज याबाबत विस्तृत व सकारात्मक चर्चा झाल्याने महामार्गालगतच्या गावातील नागरिकांचे प्रश्न पुढील काळात मार्गी लागतील, हे स्पष्ट झाले आहे.


