नांदेड| नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या नांदेड एस.टी. कर्मचारी गणेश मंडळाला सलग ३६ वर्षांपासून गणेशमूर्ती देण्याची अनोखी परंपरा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी जपली आहे. त्यांच्या निवासस्थानी आज सुमारे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह उभा राहिला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या गणपतीपासून, ट्रॅव्हल बॅग घेऊन प्रवासाला निघालेल्या गणपतीपर्यंत आणि मोबाईल-लॅपटॉप हाताळणाऱ्या आधुनिक गणरायापर्यंतची विविध रूपे या संग्रहात पाहावयास मिळतात.



दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, संगमरवर, बोनचायना, ब्राँझ, चंदनाचे लाकूड, रुद्राक्ष, सुपारी, नारळ, अगदी दोरी यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांतून तयार झालेल्या या मूर्ती पाहणाऱ्याला थक्क करतात. नटराज गणेश, विष्णुरूपी गणेश, हनुमानरूपी गणेश, कृष्णरूपी गणेश, रथारूढ, शेषारूढ, बटुवेशातील गणराय, वाद्यवृंदरूपी, दशावतारी, भरतनाट्यममुद्रा, सुटाबुटातील गणपती, घसरगुंडीवर खेळणारा गणपती, तसेच बुद्धिबळ खेळणारा गणपती अशा अद्भुत विलोभनीय भावमुद्रा या संग्रहात आहेत.



हा प्रवास सुरुवात झाला फक्त दोन मूर्तींपासून. सुरुवातीला ५१ गणेशमूर्तींचा संकल्प करून ठाकूर यांनी संग्रह सुरू केला. पण कालांतराने भक्तीभाव आणि लोकांच्या सहकार्यामुळे आज हा आकडा पाचशेपेक्षा जास्तांवर पोहोचला. नेपाळ, चीन, जपान, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, आफ्रिका, भूतान, कंबोडिया अशा देशांतूनही त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आणल्या आहेत.


भक्तीमागचा टर्निंग पॉइंट
१९८९ पर्यंत दिलीप ठाकूर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते होते. मात्र त्यांच्या आईवर आलेल्या गंभीर आजारपणाच्या काळात, हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमधील गणेशमूर्तीसमोर केलेला नवस त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. नवस फळाला आला आणि त्यांच्यातील नास्तिक भावनेचे रूपांतर कट्टर गणेशभक्तीत झाले. त्याच क्षणापासून मूर्ती संकलनाची अखंड साधना सुरू झाली.

आजही त्यांनी जपलेली एक विशेष मूर्ती अशी आहे की जिने अष्टविनायकासह अनेक नामवंत मंदिरांतील मुख्य मूर्तींना स्पर्श करून पावित्र्य लाभले आहे. या मूर्तीसमोर ठाकूर दररोज गणपती स्तोत्राचे पठण करतात.
गणेशभक्तांना प्रेरणा
ठाकूर यांच्या संयोजनाखाली सत्य गणपती येथे आतापर्यंत १५१ पदयात्रा पार पडल्या आहेत. गणेशोत्सव काळात नांदेडकरांसाठी गणेशदर्शन स्पर्धेचेही आयोजन ते करतात. त्यांच्या भक्तिभावामुळे अनेक परिचित लोक अद्वितीय गणेशमूर्ती भेट म्हणून देतात, त्यामुळे हे संग्रहालय नेहमी अद्ययावत राहते.
गेल्या तीन दशकांचा हा डोळे दिपवणारा खजिना फक्त गणेशभक्तांनाच नव्हे तर कलाप्रेमींनाही भुरळ घालतो. दरवर्षी एस.टी. कर्मचारी गणेश मंडळाला मूर्ती देण्याची परंपरा तेवढ्याच निष्ठेने पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार आहे.


