देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर गाव परिसरात आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पूरग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी देगलूरचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील स्वतः शहापूर येथे दाखल झाले.


पूरग्रस्तांसाठी विठ्ठलेश्वर मंगल कार्यालय, आर्य समाज मंदिर तसेच जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.


शहापूरातील सार्वजनिक गणेश मंडळ जय भवानी गणेश मंडळ, आपला गणेश मंडळ, दुर्गा गणेश मंडळ, पंचवटी गणेश मंडळ तसेच दानशूर नागरिकांच्या मदतीने पूरग्रस्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळचे जेवण या स्वरूपात सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत.


याशिवाय शहापूर सोबतच नरगल येथील पूरग्रस्तांसाठीही शिजवलेले अन्न नेऊन पुरवले जात आहे. या कार्याचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी कौतुक केले असून, गावकरी व मंडळाच्या सेवाभावी कामाची प्रशंसा व्यक्त केली आहे.



