बिलोली/नांदेड| सगरोळी गावात स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे. विज बिल कायदा 2003 च्या कलम 47(5) नुसार, कोणता मीटर वापरायचा याचा अधिकार ग्राहकाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीदेखील विद्युत विभागाकडून परवानगी शिवाय मीटर बदलले जात असल्याचा आरोप करण्यात आला.


नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जास्त विजबिल येत असल्याने ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांशी बैठक झाली होती. यात अंदाजे बिल टाकणे, मीटर रीडिंगमध्ये अनियमितता आणि ग्राहकांकडून जादा वसुली होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही देखरेखीखाली दोन मीटर डेमो म्हणून बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच मीटर कार्यक्षम असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मोठ्या प्रमाणावर बसवण्याचे ठरले होते.

मात्र, याकडे दुर्लक्ष करून लातूर, धाराशिव, बीड येथून आलेल्या १६ क्रुझर-बोलोरो गाड्यांतून २०० कर्मचार्यांचे पथक गावात दाखल झाले. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला. ग्रामस्थांनी प्रश्न विचारताच ही सर्व पथके गावातून पळाली, तर एक पथक गावकऱ्यांनी रोखून धरले. पोलिसांच्या मध्यस्थीने त्या पथकाला सोडवण्यात आले. ग्रामपंचायतीने चेतावणी दिली आहे की, स्मार्ट मीटर जबरदस्ती बसवले तर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. तसेच, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी विद्युत विभागाची असेल, असा इशारा ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आला आहे.



