किनवट, परमेश्वर पेशवे l मागासवर्गीय मुला मुलींच्या निवासी शासकीय वसतिगृहासाठी किनवट विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून 100 विद्यार्थी क्षमतेच्या 2 शासकीय वस्तीगृहाला मंजुरी दिल्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.संजय शिरसाट यांचे पत्र आ. केराम यांना प्राप्त झाले आहे.या वस्तीग्रहामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निवासी शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

किनवट तालुका हा मागास दुर्गम असून येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय नसल्यामुळे प्रचंड शैक्षणिक गैरसोय होत होती.

वस्तीगृहाअभावी खेड्यापाड्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थी शहराच्या ठिकाणी किरायाची खोली घेऊन अथवा ये जा करून शिक्षण घेतात.या संदर्भात आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाठ यांना पत्र देऊन 100 विध्यार्थी क्षमतेचे मुलांचे,100 विद्यार्थि क्षमतेचे मुलींचे व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 200 विद्यार्थी क्षमतेचे 1 असे एकूण तीन शासकीय वसतिगृह मंजूर करण्याची मागणी केली होती तसेच वस्तीग्रहांच्या इमारतीसाठी गोकुंदा येथे गट क्रमांक 176 मध्ये 10 एकर जागा उपलब्ध असल्याचेही त्यांनी पत्रात अधोरेखित केले होते.


किनवट येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेत मंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार भीमराव केराम यांनी किनवट तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गैरसोयीचा मुद्दा मांडून वस्तीगृहासाठी पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत किनवट तालुक्यात मागासवर्गीय मुला मुलींच्या निवासी शिक्षणासाठी 100 विद्यार्थी क्षमतेच्या दोन शासकीय वस्तीगृहाना मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्री संजय सिरसाट यांचे पत्र आमदार भीमराव केराम यांना प्राप्त झाले आहे.

किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी आश्रम शाळा, शासकीय वस्तीगृहाच्या धर्तीवर आता आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नातुन किनवट तालुक्यातील मागासवर्गीय मुला-मुलींना निवासी वस्तीग्रह उपलब्ध होणार असल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून होणारी त्यांची शैक्षणिक गैरसोय कायमस्वरूपी मिटणार आहे.
आ. भीमराव केराम यांनी मानले शासनाचे आभार
किनवट विधानसभा क्षेत्राच्या पायाभूत विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अग्रक्रमाने माझे प्राधान्य आहे. शिक्षण हे सर्वांगीण उन्नतीचा एकमेव मार्ग असून त्यादृष्टीने माझ्या मतदार संघातील मागासवर्गीय गोरगरीब विद्यार्थी सुविधेअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये ही नैतिक जबाबदारी समजून मी वस्तीगृहासाठी पाठपुरावा केला. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री ना. संजय सिरसाट यांनी माझ्या मागणीची दखल घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्यानासाठी 2 शासकीय वस्तीगृह मंजूर केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

