Mp Ashok Chavhan : ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात: खा. अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Ashok Chavan 1 Mp Ashok Chavhan : ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात: खा. अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नांदेड| शहरातील ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी खा. अशोकराव चव्हाण सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या संपर्कात आहेत.

नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्वी १०० खाटांचे होते. खा. अशोकराव चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ३०० खाटांचे नवे रुग्णालय मंजूर करून घेतले होते. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला होता व नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामासाठी २३१.२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात १३८.२१ कोटी रुपयांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

मात्र, २ ऑक्टोबर २०२३ रोजी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात घडलेल्या अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमिवर खा. अशोकराव चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ३०० खाटांच्या प्रस्तावित रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्यास ५०० खाटांचे करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला शिंदे यांनी तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना ५०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते.

त्यानुसार नव्या रुग्णालयासाठी ३७२ कोटी रुपयांचा पुनःसुधारित प्रस्ताव राज्य सरकारडे सादर करण्यात आला. ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या मान्यतेचा शासन निर्णयही जारी झाला असून, आता प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. याबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुनःसुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता तसेच नवीन रुग्णालयाचे बांधकाम २ वर्षात पूर्ण करून दरम्यानच्या आवश्यक ती पदनिर्मिती करुन पदभरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री अतुल सावे यांच्याशीही खा. चव्हाण यांची चर्चा झाली होती. त्याअनुषंगाने ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या मंजुरी प्रक्रियेला लवकरच गती मिळणे अपेक्षित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top