कंधार, सचिन मोरे | अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या कंधार शहरातील प्रमुख मार्गाला अखेर झगमगाटाची नवी ओळख मिळाली आहे. महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याच्या विद्युतीकरण व सुशोभीकरणाच्या ८० लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पण लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते बुधवार, दि. २३ जुलै रोजी संदल मिरवणुकीच्या दिवशी सायंकाळी सात वाजता करण्यात आले.


मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आकर्षक विद्युत पोल उभारण्यात आले असून, दुभाजकावर लोखंडी जाळ्या बसवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. या कामामुळे कंधार शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, रात्रीच्या वेळी मुख्य रस्ता विद्युत रोषणाईने उजळून निघत आहे.


अंधारातून प्रकाशाकडे…
काही वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव होता. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिला, पुरुष, व्यापारी आणि नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत होते. या समस्येबाबत नागरिकांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.



नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल घेत आमदार चिखलीकर यांनी मुख्य रस्त्याच्या विद्युतीकरण व सुशोभीकरणासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. काम पूर्ण झाल्यानंतर आता महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
या कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यासोबतच कंधार शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडली आहे. शहरातील मुख्य मार्गावर उभारण्यात आलेल्या विद्युत पोल आणि दुभाजकावरील सुशोभीकरणामुळे कंधारच्या वैभवात भर पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील जुमडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन आयतलवाड, कनिष्ठ अभियंता अजय चमकुरे, नगरपरिषदेचे विद्युत अभियंता सुशीलकुमार सलगलकर, शासकीय कंत्राटदार सुनील सादलापूरे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांकडून आमदार चिखलीकरांचे आभार
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारी अंधाराची समस्या दूर करून मुख्य रस्त्याचे विद्युतीकरण व सुशोभीकरण केल्याबद्दल कंधार शहरातील व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलावर्गाने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे आभार मानले. काही नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

