मुंबई| आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासह सर्व आवश्यक सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.


अमरावती विभागातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, अमरावती विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, अधीक्षक, गृहपाल तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.


विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी स्वच्छ परिसर, शुद्ध पिण्याचे पाणी आणि सकस व दर्जेदार भोजन उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश वुईके यांनी दिले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन स्वच्छता व अन्य बाबींचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक आश्रमशाळेला नियमित भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.



विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या साहित्याचा संपूर्ण तपशील गुगल शीटवर अद्ययावत ठेवावा आणि कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या यशोगाथा तसेच शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीला प्रभावी प्रसिद्धी द्यावी. विद्यार्थ्यांच्या सकारात्मक कामगिरीची माहिती समाजापर्यंत पोहोचल्यास त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल, असे मंत्री वुईके यांनी नमूद केले. यावेळी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.

