देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत करडखेडवाडी शिवारात उभारलेली गांजाची लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल १४ किलो वजनाचे, २.८० लाख रुपये किमतीचे ९५ गांजाची झाडे जप्त करण्यात आली.


ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यासाठी २० अधिकारी-कर्मचारी आणि २० होमगार्डस अशा एकूण ४० जणांच्या पथकाने मुसळधार पावसात व चिखल तुडवत शिवारात घुसून धाड टाकली. पोलिसांची ही कारवाई त्यांच्या चिकाटीची जिवंत साक्ष ठरली.



जप्त केलेल्या झाडांची फोटोग्राफी, शासकीय पंचासमक्ष वजन, सील-लेबलिंग आणि पॅकिंग यासह संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण करण्यात आली. आरोपी उमेश बालाजी कोनकेवार यांच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुंडे यांनी दिली.




