हिमालयाच्या सावलीतून कटऱ्याच्या कुशीत : यात्रेच्या उत्तरार्धाला सुरुवात
दोन दिवसांची हाऊसबोटवरील विश्रांती ही जणू काश्मीरने दिलेली राजेशाही भेटच होती. हॉटेल्स मध्ये तर वारंवार मुक्काम असतो, पण हाऊसबोट? ती अनुभवायला एकदा तरी श्रीनगरला यावं लागतं. दल सरोवरावर तरंगणारी ही लक्ख साखळी, जणू आभाळात तरंगणारी स्वप्नंच.


या डल लेकमध्ये सुमारे ७०० हाऊसबोट्स आहेत, तीन ते चार डबल बेड्स, नक्षीकाम केलेलं देवदार लाकूड, मखमली गालिचे, झुंबरे, बाथ टब, टीव्ही आणि वाय-फाय… प्राचीनतेची शोभा आणि आधुनिकतेची सोय, यांचा हा विलक्षण संगम. प्रत्येक हाऊसबोट म्हणजे जणू एका काळात अडकलेली महालाची कविता. किंमती तर कोटीत! आणि नवीन बांधण्यास बंदी असल्याने त्या विकायला सुद्धा मिळत नाहीत, अस्सल ‘शाही वारसा’!


शुभ सकाळ… शुभ आरंभ
नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता जाग आली. रात्रीच कटऱ्याच्या मार्गाची तयारी झाली होती. शिकाऱ्यांनी आम्हाला रस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वाट धरली. मला मोह झाला, चक्क चप्पू हातात घेतला आणि त्या गूढ निळ्या पाण्यात फेरफटका मारला. सर्वांनी आश्चर्याने पाहिलं, “भाऊ, हे कधी शिकलात?” मी हसलो. व्यायामही झाला आणि आनंदही.


कटरा… आम्ही येतो आहोत
नो एन्ट्री लागू होण्याआधी सर्व बसेस बाहेर पडल्या. बायकांची खरेदी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होती. प्रकाश कुलकर्णींना तातडीने निघावं लागलं. अल्पावधीत त्यांनी सर्वांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. त्यांना निरोप दिला आणि आम्ही श्रीनगर ते कटरा, २२२ किमीच्या प्रवासाला निघालो.

रस्ता, आठवणी आणि अंतर्मनातील श्रद्धा
पंपोर येथे थांबलो. केशर, ड्रायफ्रूट्स आणि शिलाजीतचा खरेदी उत्सव झाला. पण लष्करी कारणास्तव फार वेळ थांबता आलं नाही. हलमुल्ला येथे क्रिकेट बॅट्सचे दर्जेदार कारखाने होते, पण तिथेही थांबण्याची संधी मिळाली नाही.
एक आठवड्यात आपलं एक वेगळंच बंध तयार झालं होतं. बसमध्ये हास्य-विनोद सुरू होते. मी आणि माजी पोलीस उपनिरीक्षक सुभाष वानोळे सरांनी आमच्या सेवा काळातील काही रोमहर्षक, काही भावस्पर्शी अनुभव शेअर केले. जेवणाची जबाबदारी त्या दिवशी नांदेडचे सुभाष बंग यांनी उचलली होती. उत्तम भोजनानंतर क्षणभर विसावलो.
अंताक्षरीचा धमाल ठोसा
महिला भगिनींच्या आग्रहास्तव मी अंताक्षरी सुरू केली. दोन गट प्रणिता कुलकर्णी विरुद्ध प्रा. अजय संगेवार! मी नियम स्पष्ट केले, चुका केल्या तर भेंडी, तीन भेंड्या म्हणजे आउट. “कभी कभी मेरे दिल में…” पासून ते “ओ साथी रे…” पर्यंत सूर, शब्द, भाव आणि हास्य, सगळं ओसंडून वाहत होतं, अखेर संगेवार गट विजयी झाला. मजा म्हणजे, हरलेल्या गटाने विजेत्यांना जेवताना ताट वाढण्याचं ठरवलं.
फूल हौजी आणि बक्षिसांचा सडा
वसुबेन व जयंतीलाल पटेल यांनी तंबोला खेळाची रंगत वाढवली. बक्षिसांची रेलचेल! मला व सुवर्णा केंद्रे यांना दोन-दोन बक्षिसं मिळाली. सुरेश कुलकर्णी, सारिका केंद्रे, सुरेखा मुंढे, राधा घुगे आणि जयंत जोशी, यांनाही सन्मान मिळाले. वेळ कसा गेला हे कळलंही नाही.
अनोखा लंगर… माणुसकीचा महाप्रसाद
कटऱ्याच्या दहा किमी आधीच्या लंगरमध्ये चहा साठी थांबलो. इथे दृश्यच अनोखं! साबण, तेल, पेस्ट, चिप्स, बिस्किटं, कोल्ड्रिंक्स, वाटण्याची मोकळी परवानगी! जे हवं ते घेऊन जायचं, न सांगणं, न मागणं. हीच खरी यात्रेची आत्मा. आम्ही त्या लंगर सेवकांचा यथोचित सत्कार केला, ट्रॉफी, सिरोपाव आणि गुरुद्वाऱ्याचा प्रसाद देऊन.
कटऱ्यात प्रवेश… विश्रांतीची पावसधारा
संध्याकाळी साडेपाचला हॉटेल ग्रँडश्रीन मध्ये पोहोचलो. आलिशान AC रूम्स, बिनधास्त व्यवस्थापन, प्रत्येक लगेजवर रूम नंबर लिहिल्याने कोणताही गोंधळ नाही. हृदयनाथ सोनवणे यांनी दिलेल्या स्वादिष्ट भोजनाने सगळ्यांचा थकवा घालवला. दुसऱ्या दिवशी वैष्णोदेवीचा प्रवास होता. सूचना दिल्या… आणि सगळे झोपी गेले, मनात त्या दिवशीच्या आठवणींचा उजेड घेऊन… (क्रमशः…)


