नांदेड। मौजे तळणी पोस्ट लिंबगाव ता.जि.नांदेड येथील रहिवासी व्यंकटी भिवाजी डोंपले हे श्री गुरु गोविंदशिंघजी शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ऍडमिट आहेत.


त्यांनी १२ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणास सुरवात केली होती. डोंपले कुटुंबीय मागील ४० वर्षांपासून तळणी येथे रहिवासी आहेत. त्याना राहत असलेल्या जागेवर दोन विवाहित मुलांच्या नावावर दोन घरकुल आणि गांव नमुना नंबर ८ अ उतारा हवा आहे.
त्यांनी डिसेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालया समोर दोन आठवडे उपोषण केले आहे. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या उपोषणाची विशेष दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र काढून आदेशीत केले आहे.


श्री व्यंकटी डोंपले यांचे घर गावातून उठविण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या घराची स्थिती जैसे थे ठेवावी.उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून अहवाल सादर करावा. परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून अजून पीडित डोंपले कुटूंबियांना गांव नमुना आठ अ उतारा व घरकुल मिळाले नाही.


उपोषणार्थी व्यंकटी भिवाजी डोंपले हे अनुसूचित जातीचे असून त्यांचे वय ७० वर्षे आहे. त्यांच्या उपोषणास १४ दिवस झाले असून त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय हॉस्पिटल मध्ये दाखल केले. आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी तातडीने डोंपले यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व त्यांना घरटॅक्स पावती द्यावी. गांव नमुना नंबर ८ अ उतारा द्यावा. तसेच ते ४० वर्षांपासून राहत असल्यामुळे त्यांना व त्यांच्या मुलांना तात्काळ घरकुल मंजूर करावे.

सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दवाखान्यात जाऊन उपोषणार्थीची भेट घेऊन विचारपूस केली असून त्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा पुढील ९ जुलै च्या मोर्चामध्ये डोंपले यांच्या मागण्या घेउन प्रशासनास जाब विचारणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.


