
नांदेड| नांदेड येथे कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनु.जाती व अनु.जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 15 ते 30 जून 2025 या पंधरवाड्यात विशेष मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठीबक व तुषार सिंचनाबाबत तालुका, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे.


नांदेड जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड जिल्ह्यात 30 जून 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात दि. 16 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 30 जून 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.



