Meeting of ajit gopchhade ; नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची मंत्रालयात बैठक

नांदेड। नांदेड जिल्ह्यातील जल प्रकल्प पूर्ण करण्याचे अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत खा. डॉ. अजित गोपछडे यांची आज जलसंपदा मंत्रालयात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली . आंतरराज्य प्रकल्प पूर्ण करण्याचे अनुषंगाने तेलंगणा सरकारसोबत येथे 11 ऑगस्ट रोजी तेलंगणाचे जलसंपदा मंत्री , अप्पर मुख्य सचिवांसोबत बैठक होणार आहे . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे जलसंपदा प्रकल्प आता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


नांदेड जिल्ह्यातील सिंचनाची प्रश्न पूर्ण व्हावेत यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचा सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यानुषंगाने सचिवालयात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर , सचिव संजय बेलसरे , गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार , नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती.

बाभळी उच्च पातळी बंधारा मध्ये झालेला पाणीसाठा हे 13 उपसा सिंचन योजना कार्यान्वित नसल्यामुळे धर्माबाद, उमरी व बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होत नाही. लेंडी प्रकल्पाचे काम नियोजनानुसार पुर्ण करणे साठी सन 2025-26 यावर्षी 195 कोटी रु. अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्य यांच्यात झालेल्या करारानुसार समन्वय समितीची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे जेणेकरुन तेलंगाणा राज्याकडुन 218 कोटी रु. निधी येणे बाकी आहे त्यास गती मिळेल. खानापूर ता. देगलुर येथील बेघरांच्या यादीस मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे सन 2016 पासुन तो प्रलंबित आहे. त्यास मंजुरी मिळणे बाबत विनंती. तळणी बृहत लपा ता. बिलोली व जामखेड बृहत लपा ता. मुखेड या दोन्ही माती धरणाची कामे 2001 मध्ये पुर्ण झाली परंतु सिंचन व्यवस्थेची कामे अद्याप बाकी आहेत, निधीची तरतुद करुन सिंचन व्यवस्था निर्माण केल्यास 3000 हेक्टर जमीन ओलीताखाली येईल.


सुंडगी ता. देगलुर व खरबखंडगाव ता. मुखेड येथे बंधारा करणे साठी सर्वेक्षण, अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करुन काम सुरु करावे. लेंडी प्रकल्प सानुग्रह अनुदान निधीच्या प्रस्तावास नियामक मंडळाची मान्यता प्राप्त असुन त्याबाबतचा शासन निर्णय अद्याप निर्गमित झाला नाही. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी उपसा सिंचन योजनेचा वीज भार शुन्य करणे साठी सोलार प्रकल्प उभारावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित धरणाच्या जवळ ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे मासेमारी व पर्यटन स्थळ विकसित करणे यासाठी व्यवहार्यता तपासणे बाबत संबंधितांना सुचना करणे. आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली .

नांदेड जिल्ह्यातील आंतरराज्य प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशना नंतर तेलंगणा सरकारकडून 240 कोटी रुपयांचा निधी मिळवण्याच्या अनुषंगाने तेलंगणा सरकार सोबत येत्या 11 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्राची जलसंपदा मंत्री विखे यांनी घेतला आहे . या बैठकीला तेलंगणा सरकारचे जलसंपदा मंत्री , अप्पर सचिव , सचिव आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा विकासाचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो साकारण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचा बैठकांवर जोर आहे.



