नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सात सूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतीशील व दायित्व पूर्ण अंमलबजावणी करा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी आज येथे केले.


राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा नांदेड येथील आजचा प्रथम दौरा होता. त्यांनी नियोजन भवन येथे आज विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अधीक्षक अभियंता महावितरण, महापारेषण, कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, पाणीपुरवठा विभाग, नांदेड कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता महावितरण व महापारेषण, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ आदी विभागांचा त्यांनी आढावा घेतला. खासदार अजित गोपछडे यांनीही यावेळी अनेक योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशासनाचे 100 दिवस हा संकल्प पुढे ठेवण्यात आला आहे. 7 कलमी कार्यक्रम त्यासाठी दिला गेला आहे. या शंभर दिवसांमध्ये प्रशासनामध्ये झालेला बदल दर्शनी दिसला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजे, सर्व वेबसाईट अपडेट असाव्यात, कार्यालयाची स्वच्छता व प्राथमिक सुविधा परिपूर्ण असल्या पाहिजे. पारदर्शी व उद्दिष्टपूर्ण कार्यप्रणाली आत्मसात केली पाहिजे,अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्या. विविध विभागाच्या सादरीकरण संदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, कागदावरचा विकास प्रत्यक्षात उतरण्यासाठी 100 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नियोजन करण्याचे त्यांनी आदेश दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायणउपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले.
