नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथील कुसुम सभागृहात सोमवार ता.२५ नोव्हेंबरपासून ते ६ डिसेंबर दरम्यान सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभिशन चवरे यांनी नमूद केले, नांदेड केंद्रावर एकूण १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील.
सोमवारी ता. २५ झपुर्झा सोशल फाउंडेशन, परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित आणि दिग्दर्शित शापित सेवा नाटकाने स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर मंगळवारी ता. २६ स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने इरफान मुजावर लिखित आणि दिनेश कवडे दिग्दर्शित व्हाईट पेपर सादर होईल. बुधवारी ता.२७ सांस्कृतिक मंच, नांदेडचे पुन्हा एकदा (लेखक: सुहास देशपांडे, दिग्दर्शक: रवी शामराज) सादर होणार आहे. गुरुवारी ता.२८ संकल्प प्रतिष्ठान, नांदेडचे मोटिव्हेशन स्पीकर (लेखक-दिग्दर्शक: संकल्प सूर्यवंशी) तर शुक्रवारी ता.२९ राजीव गांधी युवा फोरम, परभणीचे गंमत असते नात्यांची (लेखक: रवी झिंगरे, दिग्दर्शक: विजय करभाजन) सादर होईल. शनिवारी ता. ३० मुक्ताई प्रतिष्ठान, देगलूरचे ती रात्र हा दिवस (लेखक: सुहास देशपांडे, दिग्दर्शक: राजेश देगलूरकर) सादर होतील. रविवारी ता. १ डिसेंबर दुपारी १२ वाजता जागृती सामाजिक प्रतिष्ठान, नांदेडचे मी लाडाची मैना तुमची (लेखक: द. मा. मिरासदार, दिग्दर्शक: सत्यपाल नरवाडे) व संध्याकाळी ७ वाजता क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्ट, परभणीचे सहज सुचलं म्हणून (लेखक: रविशंकर झिंगरे, दिग्दर्शक: मनीषा उमरीकर) सादर होणार आहेत.
सोमवारी ता. २ गोपाला फाउंडेशन, परभणीचे सेल्फी (लेखिका: शिल्पा नवलकर, दिग्दर्शिका: स्नेहल पुराणिक), मंगळवारी ता. ३ तन्मय ग्रुप, नांदेडचे वसुधैव कुटुंबकम (लेखक-दिग्दर्शक: नाथा चितळे), बुधवारी ता. ४ बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ, परभणीचे विक्रमाचा घातांक ‘क्ष’ (लेखक: रविशंकर झिंगरे, दिग्दर्शक: अतुल साळवे), गुरुवारी ता. ५ आंबेडकरवादी मंच, नांदेडचे गांधी आंबेडकर (लेखक: प्रेमानंद गज्वी, दिग्दर्शक: राहुल जोंधळे), तर शुक्रवारी ता. ६ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नांदेडचे वेलींच्या गाठी (लेखिका: मेधा मराठी, दिग्दर्शक: गोविंद जोशी) यांचे प्रयोग सादर होणार आहेत. सर्व नाट्यप्रेमींनी या हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक विभिशन चवरे यांनी केले आहे. नांदेड केंद्र समन्वयक म्हणून किरण चौधरी हे काम पाहत आहेत.