हिमायतनगर,अनिल मादसवार| ऐन दिवाळीच्या काळात “महावितरण’ कंपनीने ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु करून जनतेला त्रस्त करून सोडले आहे. सणासुदीच्या तयारीची धांदल सुरू असताना विजेचा सुरू झालेला लपंडाव शहरातून गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या महिला भगिनी, चिमुकले बालक व सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. ऐन दिवाळीत दिवसभर वीज गुल होत असल्याने संशुद्धीच्या काळात महावितरण कंपनीने सुरु केलेली एकाधिकार शाहीपणा बाबत ग्रामीण भागातील नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यापासून नागरिकांना विजेच्या खेळखंडोब्याला तोंड द्यावे लागत आहे. कधी सकाळी, कधी सायंकाळी अचानक वीजपुरवठा गुल होत आहे. रात्री अपरात्री आणि दिवसभर “महावितरण’ नागरिकांना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. ऐन धामधुमीच्या वेळी विजेचा खेळखंडोबा सुरू झाल्याने नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. सकाळी व सायंकाळ बरोबरच हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना अकारण रात्रीही विजेचा लपंडाव सोसावा लागत आहे.
गृहिणी व नोकरदार महिला वर्ग दिवसभरातील आपली दैनंदिन कामे रात्री लवकर आटोपून दिवाळीचा फराळ तयार करण्यात मग्न असतात. अशातच वीज गेल्याने खोळंबा होत आहे. तसेच दिवसा दुपारीही हीच परिस्थिती उद्भवत आहे. या संदर्भात “महावितरण’ च्या संबंधितांशी शेतकरी नारायण करेवाड यांनी संपर्क साधून विचारणा केली तर वरूनच प्रॉब्लेम आहे असे सांगून कनिष्ठ अभियंता लाईनमन हाथ झटकत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हिमायतनगर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांची बदली झाल्यापासून हिमायतनगर येथील कार्यालयाचा कारभार येथिल सहाय्यक अभियंता यांच्यावर पडला आहे. अधिकच्या कामाचा ताण तणाव लक्षात घेता तारमार, वीज कर्मचारी लाईनमन, यांच्यावर वरिष्ठांचा अंकुश नसल्याने कि काय..? ग्रामीण भागातील जनतेला ऐन सणासुदीच्या दिवसात खंडित वीजपुरवठ्याला तोंड द्यावे लागत आहे. याकडे वरिष्ठानी लक्ष देऊन तात्काळ हिमायतनगर महावितरण कार्यालयातही रिक्त पदांच्या जागा भरून तात्काळ सुरळीत वीज पुरवठा देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.