मुंबई/नांदेड। काँग्रेस पक्षाने आपली ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यातील हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, नायगाव येथून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मिनल निरंजन खतगावकर तर भोकर विधानसभा मतदार संघातून युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पप्पू उर्फ तिरुपती कोंडेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हदगाव येथील उमेदवारी कोणाला भेटणार यावर तर्क वितर्क लावले जात होते त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभा उमेदवारांची निवडणुकीतील उमेदवारांची ४८ पहिली यादी जाहीर करण्यात आला आहे. सदर यादीत मराठवाड्यातील अनेक उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे चार आमदार होते. त्यात भोकर, देगलूर, हदगाव व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. मात्र काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यात हदगाव विधानसभा मतदार संघातून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्ष डॉ रेखा चव्हाण यांना डावलण्यात आले आहे. नायगाव विधानसभा मतदार संघातून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मिनल निरंजन खतगावकर यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकर विधानसभा मतदार संघातून युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू उर्फ तिरुपती कोंडेकर यांची लॉटरी लागली असून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्याशी लढत होणार आहे. कोंडेकर यांना उमेदवारी दिल्याने प्रभारी जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांना पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे हंबर्डे यांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक होते. त्या मतदार संघाचा मोठा वाद आहे. शिवसेनेचा हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला हवा असल्याने या मतदार संघासाठी घोडे अडले आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे दक्षिण अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही. तसेच देगलूर राखीव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किती मतदार संघ वादात आहेत याचा आकडा समोर आला नाही.