हिमायतनगर, अनिल मादसवार| भरधाव वेगातील एका रेतीच्या ट्रॅक्टरने क्रुझरला जबर धडक देऊन क्रुझर चालकाचा बळी घेतला आहे. हि दुर्घटना दिनांक २३ च्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सरसम आबादी ते मसोबा नाल्याच्या मधील महादेव मंदिराच्या आसपास घडली आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टर मालकाने हेड जाग्यावर ठेऊन नंबर असलेली ट्रॉली पळवून नेली आहे. तालुक्यात रात्रीला चोरीच्या पद्धतीने रेतीची वाहतूक केली जात असल्याने भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने रस्त्याने प्रवास करणाऱ्यांत वाहनधारकात भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच ट्रॅक्टर सारख्या वाहनांची आरटीओ विभागाने तपासणी करून त्याच्यावर वेगामर्यादा लावावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या घरापुर, कोठा, डोल्हारी, पळसपूर, रेणापूर, दिघी, विरसनी, बोरगडी, वारंगटाकळी, धानोरासह अनेक गावच्या रेती घाटावरून आणि काही ठिकाणच्या माळरान व मोकळ्या जागेतून मुरूम या गौणखनिजचे उत्खनन महसूल अधीकाऱ्यांना हाताशी धरून केले जात आहे. तर नदी काठावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून साठेबाजी करत रात्रीला टिप्पर, ट्रॅक्टरच्या साहाय्याने विना परवाना वाहतूक करून चोरीच्या मालाची विल्हेवाट लावली जात आहे. बुधवारी रात्रीला घारापुर येथील दोन ट्रॅक्टर मालकाने सरसमच्या पुढील गावाकडे रेती रिकामी करून दुसरी खेप नेण्यासाठी भरधाव वेगात येत होते. याच वेळी हिमायतनगर कडून नांदेडकडे भाडे असल्याने क्रुझर गाडी चालक दीपक दामोदर कटकेमोड रा. शिवणी वय 35 वर्ष हे जात होते.
दरम्यान सरसम अबादीच्या अलीकडे क्रुझर गाडी आली असता समोरून भरधाव वेगात पुन्हा रेती घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या दोनपैकी एका ट्रॅक्टरने क्रुझरला समोरासमोर जबर धडक दिली. ही घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सरसम आबादी जवळील महादेव मंदिराच्या आसपास घडली आहे. या घटनेत क्रुझर चालकाच शीर धडा वेगळे होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा प्रकार लक्षात येताच ट्रॅक्टर चालक मालकाच्या मदतीने ट्रॅक्टरचे हेड जाग्यावर ठेऊन ट्रॉली लांबविली आहे. या घटनेने मयताचे नातेवाईकांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक मालकावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबत जमादार कदम यांनी सांगितले कि, रेतीच्या ट्रॅक्टरने ट्रॉली धडक दिल्याने हि घटना घडली असून, नातेवाईकांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक मालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हिमायतनगर शहरापासून वाहणाऱ्या पैनगंगा नदीसह अन्य नाले, ओढ्याच्या ठिकाणाहून महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीला मुरुमसह रेतीचे बेसुमार उत्खनन करून काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामावर चोरीच्या गौण खनिजाचा वापर केला जात असून, विनापरवाना रेती आणि मुरूमासारखे गौण खनिज काढून शासनाला चुना लावण्याचा प्रकार अधिकाऱ्याच्या संमतीने राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. सध्या निवडणुकीची धामधूम असल्याने बहुतांश महसूल अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेण्यासाठी गौण खनिज माफीया सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गौण खनिज माफिया मालामाल होण्यासाठी रात्रंदिवस गौण खनिजचे उत्खनन करून मालामाल होण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री विनापरवाना वाहतूक करून विविध बांधकाम आणि रस्ते कामासाठी चोरीचा गौण खनिज नेऊन टाकण्यात काही ट्रॅक्टर चालकाची मोठी स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेमुळे भरधाव वेगात वाहने चालविली जात असल्याने दिवस गणिक अपघात घडत आहेत. हा प्रकार नातेवाईकाच्या लक्षात आल्याने याबाबत त्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली असून, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कदम हे तपास करीत आहेत.
शासनाचा महसूल रॉयल्टी न काढता रेतीची वाहतूक करणारे बहुतांश ट्रॅक्टर चालक राजकिय वरद हस्त आणि महसूल अधिकारी यांच्या खाबूगिरी पद्धतीने निर्ढावले असून, त्यां वाहनाचा वेग पाहून समोरून येणाऱ्या दुचाकीसह अन्य वाहन धारकांना भीती वाटत आहे. ट्रॅक्टरच्या या भरधाव वेगाला अंकुश लावण्यासाठी आरटीओ विभागाने हिमायतनगर तालुक्यातील सर्वच ट्रॅक्टरची तपासणी करावी अशी मागणी सुजाण नागरिक करत आहेत.