नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेण्याची गरज असून भविष्यात नांदेड जिल्हा आरोग्य संपन्न म्हणून देशपातळीवर ओळखला जावा, नांदेड मॉडेल विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सोबत प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चर्चा केली.


खा.डॉ.अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील आरोग्याच्या विषयावर चर्चा करून सद्यस्थितीवर माहिती जाणून घेतली.


देशात नांदेड जिल्हा हा आरोग्य संपन्न करण्यासाठी ’नांदेड मॉडेल’ विकसित करण्याबाबत योजना तयार करण्याच्या मुद्यावर विस्ताराने चर्चा झाली. जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य, कुपोषित मुलांना सकस आहार, गर्भ संस्कार, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, स्तनदा माता व गर्भवती मातांना पौष्टिक आहार, मुलांसाठी सुदृढ आरोग्य , गर्भवती माता यांचे प्रबोधन आदींबाबत खासदार डॉ. अजित गोपछडै यांनी मीनल करनवाल व त्यांच्या टीम सोबत संवाद व मार्गदर्शन घेतले.


या कामी एक बालरोग तज्ञ म्हणून माझ्यासह वैद्यकीय क्षेत्रातील विविध डाक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल, डेण्टिस्ट फार्मसिस्ट आरोग्य सेवक,केमिस्ट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, यांच्या सोबत बैठक आयोजित करून या विषयात संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सीईओ मीनल करनवाल यांच्यासोबत सकारात्मक चर्चेनंतर नांदेड जिल्ह्याची उत्तम आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



