नांदेड | मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. १९ ते २१ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच्या नोंदणीस प्रारंभ झाला असून गरजूंनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले आहे. मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दरवर्षी दोन वेळा १८ वर्षाच्या आतील मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींकरीता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते.
आरोग्य शिबीरातील रूग्णांवर मुंबईच्या प्रसिध्द बाल मस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडेसह तब्बल ३०-३५ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. नेहमीप्रमाणे आवश्यकतेनुसार मोफत एमआरआय, सिटी स्कॅन, २-डी इको, ईईजी, ईसीजी, एक्सरे व पॅथॉलॉजीकल तपासण्या करण्यात येणार आहे. आरोग्य शिबीराचे हे चौदावे वर्ष असून आता पर्यंत झालेल्या पंचवीस आरोग्य शिबीरात जवळपास ७ हजार रूग्णांना लाभ झाला आहे. आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यकते नुसार दररोज शाळेतील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. जी. बजाज रिहॅब्लीटेशन सेंटर येथे फिजीओ थेरपीची सोय निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, उपाध्यक्ष कमल कोठारी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, बनारसीदास अग्रवाल, अंकित अग्रवाल आदींच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल तसेच आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आरोग्य शिबिरासाठी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी तसेच आरोग्य शिबिरासाठी प्रत्यक्ष नोंदणी करणे अशक्य असलेल्यांनी डॉ. मनिषा तिवारी (८२०८११४८३२) व संजय रुमाले (९०६७३७७५२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.