हिमायतगर| शहरातील छत्रपती नगर भागात दिवसाढवळ्या वीजचोरी करणाऱ्या एम.टी.फड या ठेकेदारावर भोकर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात वीजचोरी करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, संबंधित ठेकेदाराने दंडाची रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल झाला त्यानंतर गुत्तेदाराने दंडाची ९६ हजार ७४५ रुपयाची रक्कम भरली असल्याचे सांगण्यात आले आहे.
हिमायतनगर शहराला गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याची दखल घेऊन मागील पंचवार्षिक काळात शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपयांची प्रभावी योजना मंजुर झाली. या नळयोजनेचे काम परभणी येथील एम.टी.फड या कंत्राटदाराकडून केले जात आहे. नळयोजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, अंदाजपत्रकाच्या बगल देऊन संत गतीने काम केले जात आहे.
अद्यापही पैनगंगा नदीकाठावरील मुरली बंधाऱ्याच्या ठिकाणी नळयोजनेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले नसताना शहरात नळयोजनेच्या पाईपलाईनचे काम करताना कोट्यवधींच्या निधीतून करण्यात आलेली नव्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध फोडून केली जात आहेत. एव्हडेच नाहीतर ठेकेदार एम टि फड आणि डी.एम.मुरकुटे कन्स्ट्रक्शन यांनी संगनमत करून लघु दाबाच्या वीज वाहिनीवर आकडा टाकून दिवस ढवळ्या पाईपलाईन जोडणीसाठी लागणारी विजेची चोरी करून जोडणी केली जात होती. हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून शहरात सुरु असल्याचा प्रकार मागील महिन्यात दि.१८ नोव्हेंबर २०२२ शुक्रवारी उघड झाला होता.
वीज चोरी पकडणाऱ्या घटनेची माहिती उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनखाली महावितरणचे सहाय्यक अभियंता पवन भडंगे यांनी तात्काळ घटनास्थळावर महावितरणचे परमेश्वर शिंदे आणि नारायण आडे या कर्मचाऱ्यांना पाठवून वीज चोरीसाठी वापरलेले केबल आणि पाईप जोडण्याची मशीन जप्त केली. पाणी पुरवठ्याचे काम करणारे ठेकेदार एम टि फड आणि डी.एम.मुरकुटे यांना तीन वर्षात वापर केलेल्या युनिटचा निर्धारण रुपये ८१ हजार ७४५ रुपये आणि तडजोड आकार १५ हजार असा एकूण ९६ हजार ७४५ रुपयाचा दंड भरण्याची नोटीस बजावली होती. मात्र संबंधित वीजचोरी करणाऱ्या ठेकेदाराने एम टि फड आणि डी.एम.मुरकुटे यांनी दंडाची रक्कम दिलेल्या मुदतीत भरली नव्हती.
त्यामुळे सहाय्यक अभियंता पवन भडंगे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून संगनमताने वीजचोरी करणाऱ्या एम टि फड आणि डी.एम.मुरकुटे यांच्यावर दि.०७ डिसेंबर २०२२ रोजी भोकर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७९, भारतीय विद्दुत अधिनियम सुधारणा २००३, १३५ कलमान्वये गुन्हा दखल करण्यात आला आहे. यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हा दाखल होताच संबंधित ठेकेदाराने दंडाची ९६ हजार ७४५ रुपयाची रक्कम भरली आहे. या कार्यवाहीमुळे महावितरण अधिकाऱ्यांच्या कर्तव्याबद्दल सर्वसामान्य वीज ग्राहकातून संधान मानले जात आहे. आतातरी विजेची चोरी करणाऱ्या ठेकेदारकडून शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार बंद करून नियमानुसार कोटेशन भरून वीज पुरवठा घेत नळयोजनेचे काम केलं जाईल का..? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.