मराठवाड्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. गोळीबार, खून ,दरोडे, चोऱ्या हे प्रकार मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे प्रकार व गुन्हेगारी थांबणार नसली तरी या प्रकरणात होणारी वाढ चिंतेची बाब ठरत आहे . पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही.
मराठवाड्यातील नांदेड शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्या. नांदेडमधील बिलाल नगर परिसरात दारू पिण्याच्या किरकोळ वादातून एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर रहिमपूर या भागात अनैतिक संबंधातून एकाची तर बळीरामपूर येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ ४८ तासात एकाच पोलीस स्थानक हद्दीत लागोपाठ तीन खून झाल्याने नांदेड शहरात कमालीची दहशत पसरली आहे.
हिंगोली जिल्ह्यात असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यात असोला या गावात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने गोळीबार केला. फिर्यादी नागोराव पावडे यांनी औंढा नागनाथ युवासेना तालुका युवा अधिकारी बालाजी नागरे यास मागील सहा दिवसांपासून शिवीगाळ का करत आहेस? अशी विचारणा केली त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला . यावेळी मारुती पावडे हे मध्ये पडलेले असताना त्यांच्यावर बालाजी नागरे याने गोळीबार केला. यामध्ये मारुती यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी नागोराव पावडे यांनी गंभीर जखमी झालेल्या मारुती यांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता विशाल नागरे यांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांनाही जखमी केले. यापूर्वीही मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तसेच नांदेड जिल्ह्यातही नेहमीच गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत . बंदुकी व गोळीबार या नित्याच्याच बाबी झालेल्या आहेत. परभणीत १९ वर्षीय युवकाचा खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली.
रात्रीच्या वेळी १९ वर्षीय युवकास घरातून बाहेर बोलावून घेत त्यास मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोशनीनगर भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेत खून झालेल्या युवकाचे नाव शाहरूख हुसेन पठाण (१९. रा. रोशनीनगर, परभणी) असे आहे. तर शेख गौस, शैजादीबी शेख, मुन्नू शेख, वहिदाबी शेख (सर्वजण रा. रोशनीनगर, परभणी) अशी आरोपींची नावे आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात भेंडेवाडी येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला चोरट्यांनी चाकूने जबर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली . लक्ष्मीबाई मुंजाजी असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. असे प्रकारही मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात वाढले आहेत . नागरिकांना घराबाहेर पडल्यावर सही सलामात घरी येऊ की नाही याची देखील शाश्वती नाही. ग्रामीण भागात अंगणात व आखाड्यात ग्रामस्थांना झोपावे लागते . परंतु त्या ठिकाणी देखील ते सुरक्षित नसल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातही असेच काहीसे चित्र आहे . संपूर्ण बीड जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. दररोज चोरीच्या घटना होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. चोरटे सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम, मोटारसायकल, मोबाईल चोरी करत आहेत .परंतु आता चोरट्यांनी जनावरे चोरण्याचे सत्र सुरू केले आहे. बीडमध्ये मोकाट जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ग्रामीण भागात गोठ्यात बांधलेली जनावरे सर्रासपणे चोरीला जाऊ लागली आहेत. चराटा येथील चार बैल आणि दोन गाई चोरट्यांनी चोरून नेल्या . या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे बिथरले आहेत.
बीड शहरातील बार्शी रोडवरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी दगडाच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले . या प्रकरणात पेंडगाव येथील अक्षय दिलीप गायकवाड या चोरट्यास पकडण्यात पोलिसांना यश आले. धाराशिव जिल्ह्यात तर आठवडी बाजारात दुचाकी नेणे ही अवघड होऊन बसले आहे. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे सोनार गल्लीत भरलेल्या आठवडी बाजारातून सतीश गायकवाड यांची एम . एच. २५ ए. ए. ८११४ ही हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दिवसाढवळ्या चोरट्यांनी लांबवली. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या चोरीपासून गोळीबार, खून असे प्रकार संपूर्ण मराठवाड्यात वाढले आहेत. म्हणजेच छोट्या चोऱ्या व खून या मोठ्या घटनाही नित्याच्याच होऊन बसल्या आहेत. संपूर्ण मराठवाड्यातच गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याने एक मोठी चिंता नागरिकांना सतावत आहे.
मराठवाड्यात कायदा व सुव्यवस्था सुधारा अन्यथा हाहाकार माचेल असेच म्हणण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे पोलीसांचा वचक शिल्लक आहे की नाही, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अलिकडे वाढलेल्या गुन्हेगारी घटनामुळे सर्वत्र दहशत व भिती पसरली आहे. पोलीसवाले आहेत, आपल्याला कांहीही फिकर नाही, असे आपण पूर्वी बोलत व एैकत असू. परंतु, आता समाजात तसे दिवस राहिलेले नाहीत. गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. चोर्या, दरोडे, धमकावणे, मारामारी करणे हे तर नित्याचेच व रोजचेच होवून बसले आहे. परंतु यापेक्षा भयानक म्हणजे खुलेआम-दिवसाढवळ्या खुनाचे प्रकार घडत आहेत. एकमेकांचा जीव घेणे खूपच सोपे होवून बसले आहे. अगदी क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. जीव खूपच सोपा व स्वस्त होवून बसला आहे. एक काळ असा होता की, पोलीसस्थानकाचे प्रमुखच लोकांना, समाजाला धाकामध्ये ठेवत असत, परंतु आता तर मोठमोठ्या अधिकार्यांनाही समाजाला धाकामध्ये ठेवण्याची शक्ती शिल्लक राहिलेली नाही. काही घटनांमध्ये गुन्हा घडल्यानंतर लगेच आरोपी सापडत आहेत.
अनेकदा पोलिस अधीक्षकांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी म्हणावा तेवढा धाक ठेवत नाहीत की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे. एलसीबी, डीबी, गुप्तचर यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. आजच्या घडीला सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेली स्त्री, घरातून ज्या दागिन्यावर गेली तशीच घरी परतणार की नाही? याची भीती असते. सध्या गळ्यातील मंगळसुत्र, सोन्याची चैन हिसकावून पळणारेही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी करत आहेत. फक्त टीमलिडर खमक्या असून चालत नाही, त्यांचे सोबती व इतर अधिकारी व कर्मचारीही तेवढेच तत्पर असणे गरजेचे आहे.
सध्या नांदेड शहर एज्युकेशनल हब बनले आहे. राजस्थानमधील कोटा शहराची जी अवस्था आहे, अगदी तशीच किंवा त्यापेक्षा थोडी कमी अवस्था नांदेड शहराची बनली आहे. कोचिंग क्लासेसच्या निमित्ताने राज्यातून अनेक आई-वडील आपल्या मुला-मुलींचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी दोन-तीन वर्षांसाठी नांदेडला स्थायिक होत आहेत. यासाठी नांदेडला घर किंवा फ्लॅट भाड्याने घेवून ते डॉक्टर-इंजिनिअर घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत त्या कुटुंबीयांना किंवा त्यांच्या पाल्यांना टारगट मुलांकडून किंवा एखाद्या गल्ली बोळ्यातील ‘दादांकडून’ घाबरून रहावे लागत आहे. दररोज हाणामारीच्या घटना घडत आहेत. यावर अंकुश ठेवण्याचे काम कोणाचे आहे? कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करायला नक्कीच वाव आहे. पोलिसांनी कठोरपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडावे. त्यांना देखील त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळणे तेवढेच गरजेचे आहे. लोकसंख्या वाढलेली आहे. त्या प्रमाणात पोलीस स्थानकात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवणे गरजेचे आहे.प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय आहे.
स्वतःचे कुटुंबीय प्रिय आहेत, परंतु हे सर्व विचारात घेतांना पोलिसांनी जी नौकरी स्वीकारली आहे. अगोदर त्याचा विचार करणेही तेवढेच गरजेचे आहे. पोलीस खात्यात नौकरी स्वीकारत असतांना जी शपथ घ्यावी लागते. त्याचा विचार पोलिसांनी करावा. आज बिनदिक्कतपणे दुचाकीवर ट्रीपल सिट फिरणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठे आहे पोलिसांचा धाक अन् कुठे आहे वाहतूक शाखा. मराठवाड्याचा इतिहास पहा, पूर्वी काम करणारे अधिकारी व ठाणेप्रमुख पहा, ते कसे काम करायचे. किमान त्यांच्यासारखे काम करता येत नसेल तर कमीत कमी समाजावर तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे.
पोलिसांनी त्यांच्या धाकावरच समाजावर नियंत्रण ठेवावे, हे खूप गरजेचे आहे. आज नागरिकांना सुखाची झोप लागत नाही, कधी कुठे काय होईल. याचा नेम नाही. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील. यावर लक्ष केंद्रीत करावे, आज समस्त मराठवाडावासीय पोलिसांच्या विश्वासावर आहेत. पॅरोलवर सुटलेले, हिस्ट्रीशिटर गुन्हेगार, पूर्वीच्या अनेक गुन्ह्यात हवे असलेले आरोपी यांना पकडणे व त्यांच्या टोळ्या शोधून काढणेही तेवढेच गरजेचे आहे. शहरात दररोज दिवसा ढवळ्या होणारे गुन्हे कांही आपोआप होत नाहीत. त्यांना चालविणारे म्होरके शोधा, सापडल्यावर त्यांना खरा पोलीसी हिसका दाखवा, म्हणजे मराठवाड्यातील नागरिक सुखाचा श्वास घेतील, हे मात्र नक्की.
लेखक,,,,,डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com