नांदेड| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड व फुल पीक लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि बांधावर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शेतकऱ्यांना या योजनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे त्यांची शेती अधिक समृद्ध होईल आणि उत्पादनात वाढ होईल. विशेषतः बांबू लागवडीसाठी दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या व्यवस्थापनात नव्या पद्धतींचा वापर करण्यास आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करेल.
एक हेक्टर मध्ये 3×3 पद्धतीने लागवड केल्यास अकराशे अकरा बाबू रोपे बसतात नरेगा मधून 4 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना 7 लाख 4 हजार 45 रुपये अनुदान म्हणून नरेगांमधून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करताना पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर थेट बांबू रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती करणे, पर्यावरण संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेती व शेतीच्या बांधावर बांबू लागवड करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी केले आहे.