उमरखेड, अरविंद ओझलवार| महाविकास आघाडीच्या उबाठा पक्षाकडून तिकिटासाठी इच्छुक असलेले मोहनराव मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष कायम ठेवला होता .आज प्रचाराची रणधुमाळी संपत असताना त्यांनी आपला पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना दिल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे .
प्राचार्य मोहनराव मोरे मागील पंधरा वर्षापासून उमरखेड विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .तसेच यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमरखेड विधानसभेत आमदारकीची निवडणूक लढले आहेत तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती .यावेळी ते महाविकास आघाडीच्या उबाठा पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते .त्यांनी मातोश्रीवर जाऊन तिकिटासाठी प्रयत्न केले परंतु उमरखेड ची जागा काँग्रेसला सुटल्याने येथे काँग्रेसचे साहेबराव कांबळे हे काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहिले .
तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले मोहनराव मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला .त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठीचे प्रयत्न अपुरे पडले परंतु आज अचानक प्रचाराची रणधुमाळी संपत असताना त्यांनी आपला पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांना दिला .तर प्रचारासाठी आर्थिक मदत म्हणून साहेबराव कांबळे यांना पाच लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला .त्यांच्या पाठिंब्याने काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होणार असून यामुळे राजकीय चिन्हे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समाज एक संघ व संविधान टिकण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा – मोहनराव मोरे
मी उमरखेड विधानसभेमध्ये बंडखोर शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा होतो परंतु खासदार नागेश पाटील आष्टीकर , संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड व नितीन शिंदे यांच्या आग्रहास्तव तसेच महाविकास आघाडी साठी एक – एक आमदार महत्त्वाचा असल्याने मी फॉर्म भरला अपक्ष उभा राहिलो परंतु प्रचार केला नाही .काँग्रेसने कार्य तत्पर तडफदार उमेदवार दिल्याने ती निवडून यावेत ही अंतकरणातून इच्छा होती .त्यांना तिकीट मिळाल्यास आर्थिक मदत करीन असे वचन सुद्धा मी दिले होते.
परंतु उमेदवारी अर्ज काही कारणास्तव मागे घेऊ शकलो नाही परंतु ही निवडणूक महत्त्वाची असल्याने समाज एक संघ रहावा व संविधान टिकून राहिले पाहिजे यामुळे हा पाठिंबा देत आहे .उमेदवारी अर्ज कायम असताना विरोधक यांच्या वोट जिहाद सारख्या अपप्रचारामुळे मन अस्वस्थ झाले माझ्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या उमेदवाराला धक्का पोहोचू नये यासाठी मी प्रचार केला नाही.
मतदार संघात फिरलो नाही त्यामुळे मी पाठिंबा देत असून प्रचारासाठी साहेबराव कांबळे यांना पाच लाखाचा धनादेश देत आहे .माझी सर्व माझ्या कार्यकर्ते व माझ्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांना विनंती की त्यांनी काँग्रेसच्या पंजा निशानीवर मतदान करावे त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे मोहनराव मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले . यावेळी मोहनराव मोरे समवेत त्यांचे पुत्र डॉ युवराज मोरे , डॉ हर्षल मोरे , राजू झिंजाडे , सुभाष काळबांडे ,गजानन भारती उपस्थित होते .