नांदेड/नायगांव/उमरी/धर्माबाद| देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा ता.धर्माबाद जि.नांदेड येथिल पुर्णाकृती पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांकडून मोठे दूर्लक्ष झाल्याने पुतळा दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत असल्याची व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाकडून कापडात गुंडाळून पुतळा कपडाबंद करण्यात आलेला असला तरिही दुरुस्ती, नुतणीकरण व सुशोभिकरण याकडे पूनश्च दुर्लक्ष होत असल्यानेच येत्या मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी दि.१७ सप्टेंबर रोजी पक्षाच्यावतिने धरणे,रास्ता रोको व भीकमांगो आंदोलन करणार असल्याचा ईशारा नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे आदींनी दिला आहे.


सविस्तर वृत्त असे की,लोहपुरुष सरदार पटेल यांचा धर्माबाद तालुक्यात कारेगांव फाटा येथे ग्रामीण भागातील एकमेव पुर्णाकृती पुतळा आहे.या पुतळ्याची दोन्ही हाते तुटलेल्या अवस्थेत तसेच,परिसरातही मोठी अस्वच्छता असल्याची बाब प्रसार माध्यमातून उघडकीस आल्यानंतरही स्थानिक प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.

परंतू,ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन प्रारंभी सरदार पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले व पुतळा दुरावस्थेबाबतची माहिती स्थानिक व परिसरातील रहिवाशांकडून घेतली तसेच, त्यावर आक्रमकपणे भूमिका मांडून या पुतळ्याची दुरावस्था नव्हे तर,विटंबना असून येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून याबाबत दखल घ्यावी.अन्यथा येत्या दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनापासून याच ठिकाणी रास्तारोको,धरणे त्याचबरोबर,नव्याने पुतळा उभारण्यासाठी भिकमांगो आदोलन करण्यात येणार असल्याचा एल्गार केला होता. राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेनंतर,भारतीय स्वातंत्र्यदिनी दि.१५ ऑगस्ट रोजी नांदेडचे खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी स्वतः कारेगावफाटा येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेत उपविभागीय अधिकारी व तालुका,जिल्हा प्रशासनाला योग्यतेने कार्यवाहीचे निर्देश दिले होते.



दरम्यान, प्रशासनाकडून कापडात गुंडाळून पुतळा कपडाबंद केलेला असला तरिही दुरुस्ती,नुतणीकरण व सुशोभिकरण याकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून पूनश्च जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच,अजित पवार यांना नांदेडच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व लक्ष्मणराव भवरे यांनी निवेदन दिले असून, त्या पुतळ्यासमोर कारेगाव फाटा येथे येत्या दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी रास्ता रोको,धरणे व भिकमांगो आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. यावेळी पक्षाचे नायगांव तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, नायगांव शहराध्यक्ष संजय पाटील चव्हाण,नरसी शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, बाळू गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.


