हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून, जिकडेतिकडे व मंदिर परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊन मछरांच्या उत्पत्ती वाढल्यामुळे नागरिक, भाविक भक्त हैराण झाले आहेत. नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेने पावसाळ्या पूर्वी नाल्यांची सफाई केली नसल्याने पाहिल्याचं पावसाने स्वच्छता विभागाचे पितळ उघडं पडलं आहे. यामुळे आता शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. कर वासुलीत जसा पुढाकार घेतला जातो तसा जनतेला सुरक्षित आरोग्याची हमी देण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि खोदकाम केलेल्या रस्त्यावर होणारे अपघात टाळावे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकातुन केली जाते आहे.
काल झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने शहर परिसरात नाल्यातील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर आले असून, शहरातील बजरंग चौक, सराफ- डॉक्टर लाईन, यासह शहरातील सर्वच वॉर्डातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट रस्त्यावर जमा होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या डोळ्यांना दिसत नाही का..? हाच आहे का हिमायतनगर शहरातील कोट्यवधींचा विकास..? असा सवाल डासांची उत्पत्ती आणि पसरलेल्या दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरीकातून उपस्थित केला जात आहे. हिमायतनगर शहरातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात नगरपंचायत खर्च करते मात्र आवश्यकतेप्रमे नाल्याची सफाई नगरपंचायतीकडून नियमित केली गेली नसल्याने नालीतील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर आली आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून नागरिकाना रस्ता पार करावा लागतो आहे.
एखादे वाहन रस्त्याने गेल्यास हेच घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने शहर परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. आता तर पावसाळ्याची सुरुवात आहे. शहरात अशीच परिस्थिती राहिली तर साथीचे आजार पसरून डेंग्यू, चिकनगुनिया, डायरिया, ताप, सर्दी खोखला आदींसह पुन्हा कोरोना सारख्या आजाराची लागण होऊन रुग्ण वाढण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. असे असताना देखील येथील नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून, काही प्रभागात तर सहा सहा महिने नाल्याची सफाई केली नसल्याचे नागतिक सांगत आहेत. ही बाब लक्षात घेता नवनिर्वाचित मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याना नागरी सुविधांकडे लक्ष देण्याची ताकीद देऊन शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर पाऊलं उचलावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळा आला हिमायतनगरकरानो सांभाळून चला..!
हिमायतनगर मध्ये विकासाची गंगा वाहत आहे, 4 वर्षापासून नळ योजनेच्या नावाखाली गल्ली गल्लीतले रस्ते खोदकाम करून रस्त्याची दुर्दशा करण्यात शासन ,प्रशासन जबाबदार आहे. शहरातील वॉर्ड क्र.14/15, मुख्य रस्ते, ग्रामीण रुग्णालय परिसर ब शहरातील नाली कचऱ्याने तुंब भरलेली असल्याने पाऊसाचे पाणी नालिमध्ये न जाता रस्त्यावर वाहत आहे. त्यात पाईपलाईन साठी रस्ते खोदकाम केल्यामुळे चिखल आणि दुर्गंधी पसरलेली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, शाळकरी मुले ,महिला ,वयस्कर नागरिकांना या रस्त्यातून ये जा करण्यासाठी बरीच कसरत करावी लागत अनेकदा घसरगुंडी होऊन जखमी व्हावे लागते आहे. त्यामुळे आला पावसाळा आला… हिमायतनगरकरानो रस्त्यावर चालतांना सांभाळून चला..! असे शहरातील जागरूक महिला – पुरुष एकमेकांना सांगत नगरपंचायत यंत्रणेच्या नाकर्तेपणा बाबतीत बोट मोडत आहेत.