किनवट, परमेश्वर पेशवे। मतदान केंद्राध्यक्ष/ अधिकारी म्हणून तुम्ही मतदान केंद्रावरील सर्वात महत्वाचे अधिकारी आहात. मतदान केंद्रावरील प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. त्याच वेळी, मतदान केंद्रावर होणाऱ्या सर्व कामांसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. तुमच्या मतदान केंद्रावर मुक्त आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करणे हे तुमचे प्राथमिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे, तुम्हाला निवडणूक घेण्यासंदर्भातील कायदे, प्रक्रिया , यासंदर्भातील आयोगाच्या सूचना आणि निर्देशांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) यांनी त्यांच्याशी संलग्न इतर मतदान अधिकारी आणि मतदान प्रतिनिधीशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून त्यांच्यावर सोपविलेली सर्व कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. तुम्ही कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचे बदल न करता काटेकोरपणे पालन करावे आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कार्य करावे, तुम्ही व्हीव्हीपॅटसोबत ईव्हीएम वापरण्याबाबतचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले पाहिजे. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.
मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडिय स्कूल, कोठारी (चि ) येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 करिता नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष , प्रथम व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले निवडणूक प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके , किनवटच्या तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव उपस्थित होते.
प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे सहायक अधिकारी मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी मतदान केंद्रावर मतदान घेतानाच्या प्रत्येक टप्प्याची, मतदान यंत्राची, सर्व निवडणूक लिफापे व कागदपत्रे भरण्याची इत्यंभूत माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन (पीपीटी) द्वारे दिली. याकरिता संगणक चालक तथागत पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रत्येकी 50 प्रशिक्षणार्थी करिता एक वर्ग खोली याप्रमाणे क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी सर्वांना मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक व नमुने भरण्याचा सराव अभ्यास घेतला.
याप्रसंगी उप जिल्हाधिकारी प्रशांत शेळके व तहसिलदार तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील तरतूदी , टपाली मतपत्रिका व निवडणूकीच्या महत्वपूर्ण बाबींविषयी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 455 मतदान केंद्राध्यक्षांपैकी 443 हजर व 12 गैरहजर ; तर 450 प्रथम मतदान अधिकाऱ्यांपैकी 430 हजर व 20 गैरहजर होते. दुसऱ्या दिवशी एक हजार 239 इतर मतदान अधिकाऱ्यांपैकी एक हजार 171 हजर व 68 जण गैरहजर होते.
किनवट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे नियंत्रण अधिकारी डॉ. अजय कुरवाडे , कक्ष प्रमुख नायब तहसिलदार रामेश्वर मुंडे , सर्व नायब तहसिलदार म. रफिक म. बशिरोद्दीन , विकास राठोड , आर.जी. राठोड , कैलास जेठे , महसूल विभागाचे के.डी. कांबळे, डी.सी.भुरे, नरेश रोडे, प्रभू पानोडे, एन.एस. शिंदे, गोविंद पांपटवार तसेच प्रशिक्षण कक्षाचे सहायक अधिकारी / कर्मचारी : व्ही.टी. सुर्यवंशी, मुकेश कोल्हे , ए.जे. बोडकेवाड, एम. बी. स्वामी, बी.एल. काळे, रामदास शेंडगे, एम. के. सांगवीकर, डी.जि. क्षीरसागर, अमोल सुर्यवंशी, गणपत बोडके, शुभम राठोड, रवीदास आडे , कोमल भगत, गिता प्रधान आदिंनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.