नांदेड, गोविंद मुंडकर| “जगणे नीट करण्यासाठी मनात चांगले विचार असणे आवश्यक आहे. जगाचा प्रवाह निरंतर सुरूच राहणार आहे. त्यामुळे जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींत अडकून पडण्याऐवजी बदल स्वीकारत पुढे गेले पाहिजे. अनावश्यक ‘अटॅचमेंट’पेक्षा ‘डिटॅचमेंट’ची भावना जोपासली पाहिजे. मृत्यूकडेही जीवनातील एका ‘प्रमोशन’च्या दृष्टीने पाहिले, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि सकारात्मक होऊ शकतो,” असे प्रगल्भ विचार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले.


स्वर्गीय डॉ. प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान २०२६ निमित्त शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे आयोजित ‘जगणे नीट करण्यासाठी’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. जीवन, संघर्ष, अपयश, आत्मसंवाद, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांच्या विविध पैलूंवर झालेल्या या संवादाने उपस्थितांना अंतर्मुख केले.


यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, गुरुकुलचे अश्विन भोंडवे आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.




“अडचणींचा बाऊ नको; आजच्या क्षणात जगा” जिल्हाधिकारी कर्डिले पुढे म्हणाले, “प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात. मात्र, अडचणींचा अनावश्यक बाऊ न करता त्यांच्यावर मात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. भूतकाळातील दुःखात आणि भविष्याच्या चिंतेत अडकून न राहता आजच्या क्षणात जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे.”
जीवनात कृतज्ञतेची भावना असणे अत्यंत आवश्यक असून, केवळ स्वतःपुरता विचार न करता दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मनात असली पाहिजे, असे सांगताना त्यांनी स्वतःशी संवाद साधण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. “स्वतःसोबत प्रामाणिक संवाद साधला, तर जगणे अधिक सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण होऊ शकते,” असे ते म्हणाले.
चार वर्षांचा अभ्यासक्रम; साडेपाच वर्षांचा प्रवास – प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कर्डिले यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. अभियंता होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना स्वतःला साडेपाच वर्षे कशी लागली, याची जीवनकहाणी त्यांनी प्रांजळपणे सांगितली.
या अनुभवातून विद्यार्थ्यांना अपयशामुळे खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. जीवनातील एखादे अपयश हे अंतिम सत्य नसून, नव्या प्रयत्नांची सुरुवात असते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास आणि जिद्दीची भावना निर्माण केली.
संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा संदर्भ देताना ते म्हणाले “तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचि वाद आपणाशी.” स्वतःशी संवाद आणि आत्मपरीक्षण ही व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वपूर्ण साधने असून, आपल्या विचारांचा आणि कृतीचा प्रामाणिकपणे विचार केल्यास जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच मिळू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
“दहावी-बारावीचे गुण म्हणजे जीवनाचा अंतिम निकाल नाही” विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी समाजातील वाढत्या ताणतणावांबाबत चिंता व्यक्त केली. देशात दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक विविध अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात, तर आत्महत्यांच्या घटनाही गंभीर चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. या दोन्ही बाबींकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सध्या सोशल मीडियाचा वापर वाढत असून, मैदानी खेळ आणि प्रत्यक्ष संवादाचे प्रमाण कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ, सकारात्मक सहवास आणि प्रत्यक्ष संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “दहावी आणि बारावीतील गुण म्हणजे जीवनाचा अंतिम निकाल नाही. एखाद्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, तरी निराश न होता सातत्याने प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. चिकाटी, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो.”
जीवनमूल्यांचा प्रभावी जागर – मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी आणि माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनीही जीवनमूल्ये, संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी प्रभावी विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना जीवनाकडे अधिक व्यापक आणि प्रगल्भ दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
यावेळी अश्विन सिंधुताई सुदाम भोंडवे यांनी स्वर्गीय डॉ. प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान २०२६ स्वीकारला. सन्मानाला उत्तर देताना त्यांनी अत्यंत संवेदनशील आणि मनःस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती असली, तरी त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करण्याचे टाळले.
पसायदानाने भावपूर्ण समारोप – सकारात्मक विचार, कृतज्ञता, आत्मसंवाद, सामाजिक बांधिलकी, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता यांचा प्रभावी संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने भावपूर्ण वातावरणात करण्यात आला.
“अडचणी येणारच; पण त्यांचा बाऊ करू नका. आजच्या क्षणात जगा, कृतज्ञ राहा, स्वतःशी संवाद साधा आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा विचार करा—यातूनच जगणे नीट होऊ शकते.”
— राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी»

