नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथिल बौद्ध व मातंग समाजाची स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण काढुन अंत्यसंस्कार साठी होणारी अडचण सोडवण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी सुरू करण्यात आलेले उपोषण रात्री 8 वाजता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच ठोस आश्वासन व प्रशासनातर्फे लेखी पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे.



नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथिल स्मशानभूमीची जागा भूमीभिलेख विभागाने मोजमाप करून काढून दिली, मात्र त्या जागेवरील अतिक्रमण जैसे थेच असल्याने निधन झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी कुठं करावा असा प्रश्न पुढे आला आहे. मृत्यूनंतर देखील अंत्यविधी करण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन कामारी गावातील बौद्ध व मातंग समाजातील शेकडो महिला पुरुषांनी हिमायतनगर तहसिल कार्यालयासमोर बुधवार दिनांक 09 रोजी सकाळपासुन तळपत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले होते.



जोपर्यंत अतिक्रमण काढलं जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते महिला पुरुष नागरिकांनी घेतला होता. याची माहिती आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना समजताच हिमायतनगर तहसील कार्यालया सामोरं सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते नागरिकांची व प्रशासनाची बाजू समजून घेतली. तसेच प्रशासनाने केलेल्या अवाहणानुसार उपोषण मागे घेण्याची विनंती केली.



तसेच स्मशानभूमीची समस्या मी स्वतः जातीने लक्ष घालून निकाली काढून देतो असे लेखी आश्वासन आमदार महोदयांनी दिल्याने गावकऱ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. आमदार महोदयांनी भेट देऊन दोन्ही समाजाची गरज लक्षात घेऊन यात पुढाकार घेतला असल्याने गावकऱ्यांनी आभार मानून लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महसूल व पंचायत समिती प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, उपोषण करते महिला पुरुष व राजकिय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


