हदगाव (गौतम वाठोरे) हदगाव तालुक्यातील दैवतस्थळ श्री दत्तात्रेय संस्थान, दत्तबर्डी येथे ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
हा ऐतिहासिक सोहळा महंत श्री गोपाल गिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली पार पडला. न भूतो न भविष्य असा हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.


या दिव्य प्रसंगी श्री सुभाष शुगर प्रा. लि. साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख (ता. जि. धाराशिव) तसेच कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांच्या वतीने जवळपास ३५ हजार भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती.


प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला ४ नोव्हेंबर रोजी शिव पार्वती मंगल कार्यालयातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बँड पथक, भजनी मंडळे, ४१ घोड्यांवरील महंतांची स्वारी, तसेच ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची पालखी या मिरवणुकीचे आकर्षण होते. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात नागरिकांनी फुलहार, रांगोळी, दिवे, भगवे पताके आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले. “श्री दत्तप्रभू अवतरले” असे भास निर्माण झाले होते.



५ नोव्हेंबर रोजी पंचकोशीतील सर्व गावांतील दत्तभक्तांनी मोठ्या श्रद्धेने दत्तबर्डीकडे धाव घेतली. परिसरात “जय दत्त प्रभू”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. श्री सुभाष शुगर साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव देशमुख यांनी या संपूर्ण सोहळ्यासाठी आर्थिक मदत आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळली.


राजकीय आणि सामाजिक मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव पाटील कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवा नेते भास्कर दादा वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भास्कर दादा वानखेडे यांनी भाविकांच्या निवास, भोजन व व्यवस्थापनाचे नियोजन स्वतः पाहिले. प्रत्येक गावातील दत्तमंडळांनी आपापली जबाबदारी पार पाडून सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

दत्तनामाच्या गजरात दुमदुमलेले हदगाव
या सात दिवस चाललेल्या दत्त सप्ताहात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवून भक्तिभावाने वातावरण भारावून टाकले. महंत श्री गोपाल गिरी महाराज यांनी सांगितले की, “भाविक, मंडळे व स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा सोहळा निर्विघ्न पार पडला. दत्तप्रभूंच्या कृपेने प्रत्येक गावातील भक्तांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे निभावली.” या ऐतिहासिक प्रसंगी हदगाव शहर आणि दत्तबर्डी परिसर दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.


