नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम व परिसरात यंदा तूर हे मुख्य पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले होते. मात्र अतिवृष्टीमुळे तूर पिकाला मुळी कुज (रूट रॉट) रोगाने मोठ्या प्रमाणावर फटका दिला असून, हजारो हेक्टर क्षेत्रावरील तूर पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. पिके हातात येण्याआधीच वाळून जाणे, झाडे पडणे आणि उत्पादनात प्रचंड घट होणे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.


यात भर म्हणजे, नाफेडकडून अद्याप शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. २०२५ साली झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातात कोणतेही पीक आले नाही, अशा परिस्थितीत यंदाच्या तूर पिकावरच शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेने तीही मोडीत निघाली आहे.


सध्या प्रशासन व लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना परिसरात व्यक्त होत आहे. पीक नुकसानीचे पंचनामे, तातडीची मदत व नाफेड खरेदी सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.



मांजरम येथील तूर उत्पादक शेतकरी पांडुरंग गणपतराव शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,“सलग दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीने शेती उद्ध्वस्त केली आहे. यंदाही तूर पिकावर रोग पडून अतोनात नुकसान झाले. नाफेडने तातडीने हमीभावाने खरेदी सुरू करावी, तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करावी. अन्यथा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल.”
शेतकरी संघटनांनीही तूर पिकाचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तसेच नाफेड खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी जगला तर शेती टिकेल — शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.


