हिमायतनगर (अनिल मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून पक्षीय रणनीती, शक्ति प्रदर्शन आणि यादवी राजकारणाला चांगलीच धार आली आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, नगरसेवकपदासाठी तब्बल १०२ अर्ज दाखल झाल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे.


रविवार पर्यंत ११० अर्ज दाखल झाले असून, आज (सोमवार) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय परिसरात सर्वच पक्षांच्या इच्छुकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. उमेदवारांचे वाजतगाजत रोडशो, शक्ति प्रदर्शन, समर्थकांचे जल्लोष यामुळे तहसील कार्यालय निवडणुकीचे रणांगणच झाला आहे.


पक्षांतर्गत तणाव शिगेला – एबी फॉर्मची प्रतीक्षा कायम – नगराध्यक्ष पदाचा “एबी फॉर्म” कोणाला मिळणार याबाबत सर्वच पक्षांत उत्सुकता असून, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीच आपला अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (शरद पवार) गट या सर्व पक्षांमध्ये एबी फॉर्मसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.


१७ वार्ड – १०२ जण रिंगणात – हिमायतनगर नगरपंचायतीत एकूण १७ वार्ड असून, प्रत्येक वार्डातून नगरसेवकपदासाठी इच्छुकांची चांगलीच रांग लागली आहे. १६ नोव्हेंबरपर्यंतच नगरसेवकपदासाठी १०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी हिमायतनगरमध्ये प्रथमच तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रमुख पक्षांमध्ये काटाकाटीचीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

मतदारांशी संपर्क नसलेल्यांना कठीण दिवस? मतदारांमध्ये चर्चा सुरू असून, “निवडणुकीच्या तोंडावरच दर्शन देणाऱ्या उमेदवारांना या वेळी धडा शिकवला जाईल,” अशी जोरदार प्रतिक्रिया अनेक नागरिक देत आहेत. पक्षांपेक्षा जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणारे आणि स्थानिक प्रश्नांवर लढणारे उमेदवार लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे वातावरण दिसत आहे.
शहराचा भवितव्य ठरवणारी निवडणूक – मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, हिमायतनगर निवडणूक या वेळी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. आजी, माजी आमदार, खासदारांसह सर्व मोठे नेते या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरले आहेत. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व पक्षांसाठी हिमायतनगर ही प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.


