भोकर| मतदारसंघातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार, लोकाभिमुख आणि परिणामकारक आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची सर्वसाधारण सभा दि. २२ जुलै रोजी आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


या बैठकीत नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विविध आरोग्यविषयक उपक्रम, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, माता-बाल आरोग्य तसेच समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


शासनाच्या आरोग्य सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबतही चर्चा झाली.




यावेळी भोकर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, भोकर, अर्धापूर व मुदखेड येथील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, समितीचे सदस्य तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. “निरोगी समाज हीच विकासाची खरी पायाभरणी आहे. प्रत्येक नागरिकाला वेळेवर, गुणवत्तापूर्ण आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिले.

