सत्ता सुंदरीची नशा कशी असते पहा. एकदा ही नशा माणसाला चढली की, त्यापुढे नाती-गोती, भाव-भावना, सत्य-असत्य कशाचेही भान माणसाला राहत नाही. विधान सभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात जे सध्या चित्र दिसत आहे. त्यातून राजकारणापुढे नात्यागोत्याला कवडीमोल किंमत असते हेच दिसून येते. राजकारणाचा असा हा खेळ, नाही कोणाचा कोणाला मेळ असे सध्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात सध्या विधान सभा निवडणूक सुरु आहे. या निमित्ताने विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीत उतरवत आहेत. राजकारण ही विचाराची लढाई आहे आणि यात विचारावरील निष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे अशी सर्वाची समजूत होती. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण हे केवळ सत्तेसाठी असते. सत्ता मिळविण्याकरिता तुम्ही कोणत्याही थराला गेला तर तुम्हाला माफ आहे. राजकारणात निष्ठेला कवडीमोल किंमत असते असाच संदेश नागरिकात जात आहे. सध्या प्रमुख राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करीत आहेत. त्यानंतर घडणा-या घडामोडी पाहून लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. ज्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळत नाही तो रात्रीतून आपले उपरणे बदलून दुस-या पक्षात दाखल होत आहे आणि उमेदवारी मिळवत आहे.
उमेदवारी मागणा-यालाही काही गैर वाटत नाही आणि देणा-यालाही काही वाटत नाही. दोघांनीही निष्ठेला खुंटीवर टांगून ठेवले. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की, उमेदवारीसाठी नात्यागोत्याचाही विचार कोणी करेनासा झाला. गणेश नाईकांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली, त्याच रात्री त्यांचे सुपूत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आणि त्यांनी तिथून उमेदवारी मिळविली. म्हणजे बाप एका पक्षाकडून, मुलगा दुस-या पक्षाकडून. नारायण राणे यापूर्वी केंद्रात मंत्री होते. आताही भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्या एका मुलाला भाजपाने उमेदवारी दिली. दुसरा मुलगा शिंदेसेनेत दाखल झाला. त्याने तिथून उमेदवारी मिळविली. विदर्भात अनिल देशमुख, आशिष देशमुख या चुलत्या-पुतण्याचे राजकीय वैर जगजाहीर आहे. सर्वात मोठी भाऊबंदकी तर बारामतीत दिसत आहे.
लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्याच भावजय सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. बहिणाच्या विरोधात पत्नीला उभे केल्याचा नंतर अजितदादांना पश्चाताप झाला. त्यांनी त्याची जाहीर माफीही मागितली. आता विधान सभेत अजितदादांच्या विरोधात चक्क त्यांचा सख्खा पुतण्या उभा राहिला आहे. तोही देशातील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आशिर्वाद घेऊन रिंगणात उतरलाय. खुद्द शरद पवारांनीच त्याला उमेदवारी दिली. नांदेडमध्ये तर वेगळेच चित्र यावेळी दिसणार आहे. नांदेड जिल्ह्यात खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे लोकसभेचीही पोटनिवडणूक विधान सभेसोबतच होत आहे. लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीने डाँ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांचेच सख्खे भाऊ काँग्रेसच्या तिकीटावर नांदेड दक्षिण मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढवित आहेत.
नांदेडच्या मतदारांना आता हंबर्डेना दोन मते द्यावी लागणार. फरक एवढाच आहे की, एक मत भाजपाला जाईल, दुसरे मत काँग्रेसला जाईल. ही राज्यातील काही ठळक उदाहराणे आहेत. इतरही मतदार संघात अशा गमती जमती आहेत. उमेदवारीसाठी एका रात्रीत पक्ष बदलणा-या नेत्यांबाबत तर काही न बोललेच बरे अशी परिस्थिती आहे. असे नेते शेकड्यांनी सापडतील. सत्तेची अशी काय नशा असते की ज्या साठी माणूस आपली नातीगोती सुध्दा विसरुन जातो. देशसेवा, समाजसेवा, विकास अशा गोष्टी सांगून राजकीय नेते ज्या भूलथापा जनतेला देतात त्याहून काही तरी अधिक या नेत्यांना सत्तेच्या लाभातून नक्कीच मिळत असणार, त्याशिवाय आपली नातीगोती तोडून हे नेते निवडणुकीला आणि सत्तेला एवढे महत्व देत नसावेत हे मात्र नक्की.
सत्तेसाठी एवढा आटापिटा करणा-या नेत्यांना दोष देऊनही काही फायदा नाही. आपल्या देशाचा इतिहास सत्तेसाठी भांडणे, लढणे हेच शिकवितो. कौरव-पांडवांची लढाई ही सत्तेसाठीच होती. हस्तिनापुरचे राज्य आपल्याच हातात राहावे यासाठी दुर्योधनाने महाभारताचे युध्द घडवून आणले. त्यात त्याचा पराभव झाला हा भाग अलाहिदा. रामायण काळातही कैकयीला आपला पूत्र भरत अयोध्येचा राजा व्हावा असेच वाटले. त्यासाठीच रामाला चौदा वर्षे वनवासात काढावी लागले. सत्तेसाठी सत्ययुगात घडलेल्या या घटना असताना कलियुगात सत्तेसाठी सुरु असलेल्या घटनांना दोष देण्यात काय अर्थ आहे? दुःख एका गोष्टीचे आहे. रामायण काळात कैकयीने भरताला राज्य मिळावे यासाठी जीवाचा आटापिटा केला.
परंतु भरताने रामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेऊन राज्य केले. तो स्वतः कधी राजा झाला नाही. हे राज्य रामाचेच या भावनेने त्याने राज्यकारभार चालविला. स्वतः कधी सिंहासनावर बसला नाही. महाभारत काळात दुर्योधन चुकीचे करतो याची जाणीव असतानाही भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण यासारखे अनेक महारथी कौरवाच्याच बाजुने लढले. आपल्याला मरण पत्करावे लागेल या भितीने त्यांनी कधी पांडवाच्या पक्षात प्रवेश केला नाही. या महारथींनी महायुध्दात मरण पत्करले परंतु कौरवाची साथ सोडली नाही. इतिहासाची ही दुसरी बाजू आजचे राजकीय नेते आणि जनताही विसरली. त्यामुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकशाहीचा खेळखंडोबा होताना दिसत आहे.
….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. २८.१०.२०२४, मो.नं. ७०२०३८५८११