नांदेड| कोजागिरी पौर्णिमेनिमित्त येथील आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ८८ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आणि गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील व परिसरातील कवी, गायकांनी सहभागी होत जुन्या सुरेल गाण्यांची अविस्मरणीय बरसात केली. महागायक मोहम्मद रफी यांचे चाहते शंकर धोंगडे यांनी रसिकांना ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने मंत्रमुग्ध केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जुन्या गितांचे गायन आणि कविसंमेलन हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी डी. डी. सुपे हे होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, बालाजी थोटवे, आनंद वाघमारे, कवी पंडित पाटील बेरळीकर, साहित्यिक कवी विरभद्र मिरेवाड, गौतम हिंगोले, माधव कांबळे आदींची उपस्थिती होती.
शहरातील मालेगाव रोड स्थित पवननगर येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या उपकार्यालयात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने मंडळाच्या ८८ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शरदीय चांदण्याच्या चंद्रप्रकाशात मंगलमय आश्विन पौर्णिमेचा दुग्धशर्करा योग प्राशन करीत ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, पंडित पाटील बेरळीकर, विरभद्र मिरेवाड, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, पांडुरंग कोकुलवार, प्रल्हाद घोरबांड यांनी एकापेक्षा एक सरस आणि दमदार कविता सादर करीत रंगत आणली तर शंकर धोंगडे यांनी ‘तेरे नाम का दिवाना’, प्रज्ञाधर ढवळे यांनी ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना’, शरदचंद्र हयातनगरकर यांनी ‘ओहरे ताल मिले नदी के जल में’, प्रल्हाद घोरबांड यांनी ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, नागोराव डोंगरे यांनी ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई’, पांडुरंग कोकुलवार ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ या गीत गायनाची मेजवानी देत संगीतमय कोजागिरी जागविली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन उद्घाटन करण्यात आले. तसेच आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कविसंमेलन व गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. काव्यपौर्णिमेचे अध्यक्ष डी. डी. सुपे यांनी अध्यक्षीय समारोप केला. केशरयुक्त सुगंधी मसाले दूध देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेने उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविलेले कवी साहित्यिक विरभद्र मिरेवाड व जिल्हा परिषद हायस्कूल बारडचे माध्यमिक शिक्षक आनंद वाघमारे यांचा शाल, पुष्पहार व ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वी पालक म्हणून नागोराव डोंगरे यांचा सत्कार तर वाढदिवसानिमित्त उमेश अंबुलगेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र प्रज्ञाधर ढवळे यांनी हाती घेतले होते. आभार पांडुरंग कोकुलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.