हिमायतनगर, अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी रास्त असून, ती मान्य करावी आणि उपोषण थांबवावे अन्यथा त्यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर येथील सकल ओबीसी समाजातर्फे दिनांक 30 जुलै रोजी हिमायतनगर शहर कडकडीत बंद करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
ओबीसी समाज बांधवांना न्याय हक्कासाठी ओबीसी समाजचे कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार दिनांक २१ जुलैपासून हदगाव तालुक्यातील कवणा येथे अमर उपोषणास बसले आहेत. आज त्यांना उपोषणाला सात दिवस लोटले असून, शासनाने साधी दखल देखील घेतली नाही. सुरु असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सकल ओबीसी समाज त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील सकल ओबीसी बांधव संतप्त झाले असून, उपोषणकर्ते अनंतवार यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर येथील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात ओबीसी बांधवांनी उपोषणकर्ते दत्तात्रय आनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दाखल घ्यावी. त्यांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्या अन्यथा दिनांक ३० जुलै रोजी हिमायतनगर येथील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने हिमायतनगर बंद ठेवण्यात येईल. आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असे निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रति ह्या तहसीलदार हिमायतनगर, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, यांना दिले असून, यावेळी ओबीसी समाज संघटना तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, उपाध्यक्ष दिलीप राठोड, श्यामसुंदर ढगे संतोष सातव, राम पाकलवार, मारोती शिंदे, महादा आंबेडल्लू, पी. के. चव्हाण आदींची उपस्थिती होती.